

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी संस्थेचे संचालक विनय गजानन पाटील यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. पिशवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासन यांच्या नियमावलीनुसार पारदर्शीपणे शिक्षक पदाची भरती झाली आहे. या प्रक्रियेस संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी व कॉलेज कमिटीने मान्यता दिली आहे.
विनय पाटील हे एका उमेदवाराच्या निवडीसाठी आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी फोनवरून आपणावर दबाव आणल्याचे आणि संबंधित उमेदवारीची निवड न झाल्याच्या रागातून फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली आहे. यामुळे आपल्या जीवितास धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पिशवीकर यांनी संस्थेकडेही याबाबत तक्रार केली आहे.