वारणानगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गेल्या महिन्यात पुढे ढकललेला वारणानगर दौरा येत्या सोमवारी, दि. 2 सप्टेंबर रोजी होत आहे. त्या द़ृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमास पन्नास हजार महिला-पुरुष उपस्थित राहणार असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे 200 कोटींवर ठेवी असणार्या शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन तसेच सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती वारणा बझार, वारणा बालवाद्यवृंद, कॅडबरी, बोर्नव्हिटा या संस्थांनाही भेट देणार आहेत. ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक व पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यांचा उचित सन्मान या सोहळ्यात करणार असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.