कोल्हापूर : जिल्ह्यात विधानसभा मतदानपूर्व काळात अखेरच्या 72 तास, 48 तासांत कोणत्याही प्रकारे आचरसंहिता उल्लंघन झाल्यास तत्काळ गुन्हे नोंदवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिस अधिकार्यांच्या दूरद़ृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, बुधवार दि.20 रोजी मतदान होणार असून सोमवार, दि. 18 रोजी सांयकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. या कालावधीत कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून नेमणुका करा, मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये. शेवटच्या कालावधीतील प्रचारावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष लक्ष द्यावे. विनापरवानगी प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी प्रचारावर बारीक लक्ष ठेवावे. सार्वजनिक कार्यक्रमांची नेमकी कारणे शोधा. संशयित सार्वजनिक कार्यक्रमात आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास कडक कारवाई करा. रात्री अकरानंतर कुठेही हॉटेल सुरू राहणार नाहीत याची दक्षता घ्या. फिरती पथके, स्थिर पथकांनी अॅक्टिव्ह राहून कामे करावी याकरीता निवडणूक निर्णय अधिकार्यांनी भेटी देऊन तपासणी करावी.
उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्र तसेच गावी घेऊन जाताना आढळल्यास गुन्हे नोंदवा. शेवटच्या मतदानपूर्व तासातील सर्व नियमावलींची कडक अंमलबजावणी करा, असे आदेशही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 20 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात ड्राय डे राहणार आहे. दि. 23 रोजी मतमोजणी दिवशीही सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार आहेत.बेळगाव जिल्हाधिकारी यांनीही दि. 18 रोजी सांयकाळी सहा ते बुधवार दि.20 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि दि. 22 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून दि.23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या सीमेपासुन कर्नाटकातील 5 कि. मी. हद्दीतील सर्व किरकोळ दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 253 गुन्हे नोंदविले असून 244 जणांना अटक केली आहे. 96 लाख 80 हजार 386 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली.