

कोल्हापूर : जिल्ह्यातील 67 धरणांची मान्सूनपूर्व तपासणी पूर्ण झाली आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही सर्व धरणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाने स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायजेशनला सादर केला आहे.
जिल्ह्यात मोठे 4, मध्यम 12 आणि लघू 56 असे एकूण 72 प्रकल्प आहेत. त्यापैकी 67 धरणे स्ट्रक्चरल ऑडिटसाठी निश्चित केली आहेत. त्यांची जलसंपदा विभागाकडून मान्सूनपूर्व तपासणी करण्यात आली आहे. या धरणांच्या तपासणीचा अहवाल नॅशनल डॅम सेफ्टी अॅथॉरिटीने विकसित केलेल्या ‘डीएचएआरएमए’ या वेब पोर्टलद्वारे राज्य शासनाच्या स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायजेशनला सादर केला आहे.
या मुद्द्यावर झाली तपासणी
रचनात्मक स्थिती : धरणाच्या मुख्य भिंतीवर (क्रेस्ट), अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम उतारावर काही भेगा, खचणे किंवा असामान्य हालचाल आहे का, भराव -पिचिंग खचले आहे का, भूस्खलनाचा कुठे धोका आहे का याची तपासणी.
पाण्याची गळती आणि निचरा : धरणातून होणारी अतिरिक्त गळती किंवा तळाशी पाण्याचे उकळ तयार होत आहेत का, तसेच पाण्याचा निचरा करणार्या अंतर्गत प्रणालींची कार्यक्षमता.
सांडवा आणि दरवाजे : अतिरिक्त पाणी वाहून नेणारा सांडवा, जलविद्युत प्रकल्प किंवा धरणाचे सेवा दरवाजे सुरळीत उघडतात का, ते गाळ किंवा कचर्यामुळे अडकलेले नाहीत ना?
जमिनीची धूप आणि वनस्पती : धरणाच्या मातीच्या भिंतीवर जास्त प्रमाणात झाडे किंवा झुडुपे वाढली आहेत का (अशा झाडे आणि झुडपांच्या मुळांमुळे गळती होऊ शकते), त्याचप्रमाणे लाटांमुळे धूप होत आहे का.
तांत्रिक मापन : धरणाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले विविध सेन्सर्स, पिझोमीटर आणि इतर मोजमाप साधने व्यवस्थित काम करत आहेत का, त्यांचे निष्कर्ष सामान्य मर्यादेत आहेत का.