Gaganbawda census test | जनगणना पूर्व चाचणीला गगनबावड्यातून प्रारंभ

राज्यातील तीन ठिकाणांची निवड; 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार चाचणी
Gaganbawda census test
कोल्हापूर : राज्यातील जनगणनेच्या पूर्व चाचणीला गगनबावड्यात सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित महसूल व जनगणना विभागाचे अधिकारी, प्रगणक, पर्यवेक्षक आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : देशात 2027 मध्ये होणार्‍या जनगणनेची तयारी सुरू झाली असून राज्यात सोमवारी (दि. 10) पूर्व चाचणीला गगनबावडा तालुक्यात प्रारंभ झाला. या चाचणीसाठी राज्यातील संपूर्ण गगनबावडा तालुका, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील दहा गावे आणि मुंबई शहरातील एम वॉर्डमधील काही भाग अशा तीन ठिकाणांची निवड केली आहे.

देशाची 2021 मध्ये होणारी 16 वी जनगणना कोरोनामुळे रखडली होती. ती आता मार्च 2027 मध्ये होत आहे. तत्पूर्वी देशाच्या काही भागात ऑक्टोबर 2026 मध्ये ही जनगणना होणार आहे. प्रथमच डिजिटल स्वरूपात आणि दोन टप्प्यात होणार्‍या या जनगणनेसाठी राज्यातही तयारी सुरू करण्यात आली आहेत. जनगणनेसाठी गावांच्या सीमा निश्चित करण्याचे काम सुरू असून 30 डिसेंबरपर्यंत सीमा गोठवण्यात येणार आहेत.

दरम्यान, या जनगणनेसाठी पूर्व चाचणी घेतली जाणार आहे. त्याकरिता राज्यातील तीन ठिकाणांची निवड केली आहे. या तीनही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील घर यादी आणि घर गणनेचे कामाची चाचणी घेण्यास आजपासून सुरुवात झाली. ही चाचणी 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. गगनबावडा तालुक्यातील सर्व 45 गावांची या चाचणीकरीता निवड करण्यात आली आहे. या चाचणीद्वारे डिजिटल जनगणनेत येणार्‍या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. यावेळी गगनबावड्याचे तहसीलदार बी. जे. गोरे, जनगणना विभागाचे राज्याचे सहसंचालक वाय. एस. पाटील, सहायक संचालक प्रविण भगत, सांख्यिकी निर्देशक तुषार पाटील, राजवर्धन पाटील आदींसह प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात घर यादी आणि घर गणना

पहिल्या टप्प्यात घर यादी आणि घर गणना केली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात लोकसंख्येची गणना होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरातील उपलब्ध स्वच्छतागृह, स्नानगृह, घरांचे आकारमान, स्वरूप आदी सुविधांबाबत तसेच मोबाईल, दूरध्वनी, टीव्ही, संगणक, वाहने आदी घरातील साधनसामग्रीबाबत माहिती घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news