

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासावर दैनिक ‘पुढारी’ची छाप आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत ‘पुढारी’चा वाटा मोठा आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागरी गौरव समितीचे अध्यक्ष, खासदार शाहू महाराज यांनी काढले.
दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव हे वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ व त्यांनी आपल्या पाच तपांचा प्रदीर्घ पत्रकारितेचा लेखाजोखा मांडलेले ‘सिंहायन’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. 5) पोलीस मुख्यालयामधील मैदानावर झाला. त्याप्रसंगी खा. शाहू महाराज बोलत होते.
खा. शाहू महाराज यांनी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे काही मागण्या मांडल्या. ते म्हणाले, अंबाबाई मंदिर विकासाच्या नुसत्या चर्चाच होत आहेत. त्याला निधी कधी मिळणार? मंदिर परिसर विकासासाठी निधी मिळावा. कोल्हापुरातील रस्ते चांगले झाले पाहिजेत. रेंगाळलेली विकासकामे सुरू झाली पाहिजेत. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले; मात्र खंडपीठ होण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरू करावी. कोल्हापूर-पुणे वंदे भारत रेल्वे दररोज सुरू करावी.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जे माफ करावीत, असे सांगून खा. शाहू महाराज म्हणाले, शासनाने पुढील वर्षी जूनपर्यंत कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र तोपर्यंतचे काय? शासनाने आतापासून जूनपर्यंत शेतकर्यांना अनुदान स्वरूपात अर्थसाह्य करावे. त्यामुळे शेतकर्यांचा सातबारा कोरा राहील. कोल्हापूर विमानतळासाठी वाढीव धावपट्टी करावी, गोवा, नाशिक, इंदूरसह देशभर कोल्हापुरातून विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव द्यावे, कोल्हापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशा मागण्याही खा. शाहू महाराज यांनी केल्या.