

कोल्हापूर : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच तत्त्वनिष्ठ आणि निरपेक्ष भावनेने पत्रकारिता केली. स्वतःचे राजकीय विचार कधीही वृत्तांकनात न आणता त्यांनी सत्य आणि तत्त्वांवर आधारित पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पुढारी’ महाराष्ट्रात ताठ मानेने उभा आहे. या दैनिकाच्या वर्चस्वाला कोणीही धक्का देऊ शकत नाही. कारण, ‘पुढारी’ हे केवळ वृत्तपत्र नसून बहुजन विकासाचे माध्यम बनले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवोपद्गार काढले. ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, पद्मश्री ग.गो. जाधव यांच्या ध्येयवादी पत्रकारितेचा वारसा डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी समर्थपणे पुढे नेला. ग.गो. जाधव हे सत्यशोधक चळवळीचे आणि महात्मा गांधींच्या विचारांचे अनुयायी होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत मर्यादित साधनांमध्ये त्यांनी पत्रकारितेचा खडतर प्रवास सुरू केला. त्यांचा तो वारसा पुढे नेत आज डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी या समूहाला नवी दिशा दिली आहे.
पुढारीच्या योगदानाशिवाय या भागातील कोणताही लढा किंवा चळवळ पूर्ण होत नाही. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी पुढारीने सातत्याने लढा दिला. म्हणूनच घराघरात पुढारी आहे. पितापुत्रांना ग.गो. जाधव आणि प्रतापसिंह जाधव पद्मश्री पुरस्कार प्राप्त होणे ही देशाच्या पत्रकारितेतील दुर्मिळ आणि अभिमानास्पद घटना आहे, असेही पवार यांनी नमूद केले.
अजित पवार म्हणाले, पुढारी हे फक्त वृत्तपत्र नाही, तर ती एक सशक्त संस्था आहे. ते लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून बहुजनांच्या विकासाचे माध्यम बनले आहे. डॉ. जाधव यांच्या पत्रकारितेत संघर्ष आहे, पण विखार नाही. त्यांची टीका विधायक आणि समाजहिताची असते. त्यांनी पत्रकारितेला कधीही राजकारणाच्या चौकटीत अडकू दिले नाही.
डॉ. जाधव यांनी वडिलांची किर्ती सांगत बसण्याऐवजी अथक परिश्रम करून पुढारीचा विस्तार महाराष्ट्रभर घडवला. त्यांची पत्रकारिता म्हणजे जनतेच्या हितासाठीचा प्रामाणिक संघर्ष आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुढारीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आले होते, तर अमृतमहोत्सवी समारंभासाठी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. एका वृत्तपत्राच्या दोन ऐतिहासिक कार्यक्रमांना दोन पंतप्रधान उपस्थित राहणे हा महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील दुर्मिळ योग आहे. ही उपस्थिती म्हणजे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गेली पाच दशके जोपासलेल्या प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी असलेल्या पत्रकारितेचा सन्मान आहे,फफ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.