

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी आणि कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर (Prashant Kortkar) याला सोमवारी तेलंगणामधून अटक करण्यात आली. आज (दि. २५) त्याला कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले. कोरटकरला न्यायालयाच्या मागील दरवाजातून नेण्यात आले. त्यामुळे शिवप्रेमींतून संताप व्यक्त केला.
दरम्यान, इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरटकर यांने पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही, असा दावा कोरटकरने न्यायालयात केला आहे. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. कोरटकर चंद्रपूर पोलिस मुख्यालयाच्या समोर राहत होता. पोलिसांच्य़ा जवळ राहून तो फरार असेल, तर याची चौकशी केली पाहिजे. आमची लढाई कोरटकर सारख्या प्रवृत्तीविरोधात आहे. इतर लोकांनी कोरटकरला मदत केली, याची चौकशी केली पाहिजे.
इंद्रजीत सावंत म्हणाले की, कोरटकरने एका उन्मादातून मला फोन केला होता. कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय कोरटकर इतक्या दिवस फरार राहू शकत नाही. कोरटकरला कोण वाचवतंय याचा शोध पोलिसांनी घ्यावा. कोरटकरला मी कॉल केला नाही. महिन्याभर सापडत नव्हता, म्हणजे त्याच्या पाठीमागे कोणती तरी यंत्रणा आहे, असा पुनरूच्चार सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी केला.