

वडणगे : अडीच वर्षांत सरकारला बहिणी आठवल्या नाहीत. लहान मुली, महिलांवरील अत्याचार दिसले नाहीत. भाजप हे विकृत मानसिकतेचे सरकार आहे. तिथे वरपासून खालपर्यंत महिलांना तुच्छ लेखणारी मानसिकता आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप - शिंदे सेना सरकारला बहिणी आठवायला लागल्या. पण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आम्हाला बहिणींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जिजाऊ - सावित्रीच्या लेकींची मते पैशाने विकत घेणार्यांना बहिणीच धडा शिकवतील, असा जोरदार हल्ला खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीवर चढविला.
महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार राहुल पी. पाटील यांच्या प्रचारार्थ निगवे दुमाला (ता. करवीर) येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राहुल पाटील व तेजस्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास महिलांची तोबा गर्दी झाली होती. ‘आम्ही बहिणी राहुल पाटील यांच्यासोबत’, हा नारा यावेळी घुमला.
खासदार शिंदे पुढे म्हणाल्या, मतांच्या रूपाने राहुल पाटील यांना विजयी करून पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहूया. देशात काँग्रेसने महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन महिलांचा सन्मान केला. महिला व गरिबांसाठी अन्नधान्य, संजय गांधी, रमाई आवाससारख्या अनेक योजना काँग्रेसने आणल्या. खोकेवाले बोके सरकारने कितीही पैशाचा वापर केला तरी आमच्या माता-भगिनी झुकणार नाहीत. राहुल पी. पाटील म्हणाले, आपला आशीर्वाद मुलगा म्हणून, भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहूदे. तेजस्विनी राहुल पाटील यांनी राहुल पाटील यांच्या हात चिन्हासमोर बटण दाबून आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी अश्विनी धोत्रे, अपर्णा पाटील, कु. समृद्धी गुरव यांची भाषणे झाली. श्रुतिका काटकर, रसिका पाटील वृषाली पाटील, विजयमाला चौगले, अर्चना खाडे, मंगल कळके, शुभांगी शिरोळकर, सुजाता सुतार, तेजस्विनी लोहार, पूनम सातपुते, वंदना पाटील, सुनंदा पाटील, उषाताई माने, शुभांगी शिरोकर, तेजस्विनी लोहार, पूनम सातपुते, महिला उपस्थित होत्या.