

कोल्हापूर : सासनेनगर परिसरातील प्रकाश जयवंत दळवी (वय 45) याचा आर्थिक वादातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दळवी याला पुईखडीजवळील मैदानात अमानुष मारहाण केल्यानंतर त्याला शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील शेतातील खोपीत रात्रभर ठेवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य संशयित सचिन भीमराव घाटगे (32, रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, फरारी दोघांचा शोध सुरू आहे.
सचिन घाटगेसह बट्टू ऊर्फ रोहित रामचंद्र कांबळे (वय 28), योगेश गुंडा खोंद्रे (31, सर्व रा. शिरोली दुमाला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. अष्टविनायक पार्क, आर.के.नगर, कोल्हापूर) व ओंकार अनिल पाटील (शिरोली दुमाला) हे दोघे संशयित फरारी आहेत. पोलिस त्यांच्या शोधासाठी कर्नाटक व गोव्याला गेले आहेत. संबंधितांना लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. बुधवारी (दि. 2) रात्री आठ ते गुरुवारी (दि. 3) सायंकाळदरम्यान हा प्रकार घडला. संशयितांनी प्रकाश दळवी याला जरगनगर येथील एका बारमध्ये मारहाण केली. तेथून त्याला मोपेडवरून नेले. पुईखडी येथील मोकळे मैदान, तसेच रिकाम्या जागेत नेऊन त्याला मारहाण करण्यात आली.
मारहाणीत बेशुद्ध झालेल्या दळवी याला शिरोली दुमाला येथील सचिन घाटगे याच्या शेतातील खोपीत रात्रभर ठेवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला. दुसर्या दिवशी दुपारी मृतदेह वाशी नाका येथील पदपथावर फेकून हल्लेखोर पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. केवळ आर्थिक वादातून कट रचून खून केल्याचेही पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. दळवी हा कागल एमआयडीसीमध्ये काम करीत होता. संशयित सचिन घाटगे, अजिंक्य पाटील, ओंकार पाटील हे त्याच्याशी परिचित होते. सचिन पाटील व अजिंक्य पाटील यांची व्यवसायासाठी कर्जाकरिता वर्षभर धडपड सुरू होती. दळवी याने तुम्हाला कर्ज मंजूर करतो, असे सांगून संशयितांकडून 65 हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
पैसे घेऊनही कर्ज मिळत नसल्याने सचिन घाटगे व अजिंक्य शहापुरेसह त्याचे साथीदार दळवी याच्या मागे लागले होते. बुधवारी रात्री दळवी हा जरगनगर येथील बारमध्ये बसला होता. तेथे त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्यात झटापट झाली.
संशयित घाटगे, शहापुरेसह अन्य साथीदारांनी लाथा-बुक्क्यांसह दळवीला अमानुष मारहाण केली. त्याला जमिनीवर आपटले. दळवी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रोहित कांबळे, योगेश खोंद्रे व ओंकार पाटील यांनी मुख्य संशयित सचिन घाटगे याच्या शेतातील खोपीत रात्रभर ठेवले. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या दळवी याचा तेथेच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दळवीचे बंधू संदीप दळवी यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. करवीर पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, किशोर शिंदे, उपनिरीक्षक नाथा गळवे व अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा पोलिसांनी छडा लावला व संशयित मारेकर्यांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. कोणतीही माहिती उपलब्ध नसताना रणजित पाटील, विजय तळसकर, सुजय दावणे, राहुल देसाई, अशोक नंदे, सुभाष सरवडेकर, योगेश शिंदे यांनी गुन्हा उघडकीला आणला. त्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांचे अभिनंदन केले.