

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कागलच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांची एन्ट्री झाली आहे. संजय मंडलिक यांच्या मागे प्रकाश आबिटकर यांनी आपली ताकद उभा केली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून मंडलिक गटाने आपले उमेदवार अज्ञात स्थळी हलविले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच त्यांना परत आणले जाणार आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांच्यातील शीतयुद्ध जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठातील राजकारणाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.
प्रकाश आबिटकर व संजय मंडलिक यांच्यात राजकीय जवळीक आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध प्रकाश आबिटकर व संजय मंडलिक यांच्यात उघड उघड संघर्ष झाला होता. एकमेकांविरुद्ध त्यांनी पॅनेल उभे केले होते. यामध्ये बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय मंडलिक व पालकमंत्र्यांचे भाऊ अर्जुन आबिटकर हे मुश्रीफ यांच्या पॅनेलविरोधात निवडून आले होते.
कागलच्या राजकारणाने जसे अनपेक्षित वळण घेतले तसेच जिल्हा बँकेतही झाले. मुश्रीफ पॅनेलविरोधात जिल्हा बँकेत संचालक म्हणून विजयी झालेले बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर आज मुश्रीफ ज्या पक्षाचे नेते आहेत त्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर मध्यंतरी मुश्रीफ व मंडलिक यांच्यात चांगलीच राजकीय जवळीक होती. हेही अनपेक्षित राजकीय वळणच होते.
कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ व संजय घाटगे विरुद्ध समरजित घाटगे व संजय मंडलिक असा संघर्ष घडणार, असे अपेक्षित होते. उमेदवारीची चर्चाही झाली होती; मात्र अनपेक्षितपणे मुश्रीफ व समरजित एकत्र आले आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकच धमाका झाला. मोठ्या भूकंपानंतर जसे छोटेछोटे धक्के बसतात तशीच सध्याची राजकीय अवस्था आहे. आता या वळणाचे तसेच छोटे छोटे धक्के बसायला सुरवात झाली आहे. संजय मंडलिक व प्रकाश आबिटकर एकत्र आले आहेत. त्यांनी चिकाटीने लढाई करायची ठरवले आहे. प्रकाश आबिटकर व मंडलिक यांनी आपल्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलविले आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यावरच ते प्रचाराला परत येतील. दि. 21 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असून जेथे उमेदवारीबाबत अपिल दाखल आहे तेथे दि. 25 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे.
सरकारमधील मंत्री एकमेकांविरोधात
महायुतीच्या सरकारमधील दोन मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील राजकारणात पालकमंत्री अबिटकर यांनी लक्ष घातले आहे. तो चर्चेचा विषय ठरला आहे. एकाच सरकारमधील दोन मंत्री एकमेकांविरोधात येणे हे राजकीय दुर्मीळ उदाहरण यानमित्ताने समोर आले आहे. राज्याच्या राजकारणात ज्या गोष्टी घडत आहेत, त्या पाहता राज्य पातळीवरून या संघर्षात कोणी वरिष्ठ नेता लक्ष घालेल, अशी शक्यता दिसत नसल्याचे राजकीय निराक्षकांचे मत आहे.
मुश्रीफ-आबिटकर यांच्यात नव्या वळणावर नवा संघर्ष
मुश्रीफ व आबिटकर यांच्यात निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यापासून संघर्ष सुरू आहे. निवडणुकीपूर्वी मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर पुन्हा त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार, अशी अपेक्षा होती; मात्र संख्याबळात राष्ट्रवादी मागे पडल्याने शिवसेनेच्या राजकीय ताकदीवर शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्रिपद मिळाले. तेथे मुश्रीफ यांचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर सर्किट हाऊसमधील प्रतिष्ठेच्या भुदरगड या सूटमध्ये कोणी राहायचे, यातून त्यांच्यातील स्पर्धा उघड झाली. अखेर त्या सूटवर पालकमंत्र्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला.