

आजरा : मी आजरेकर म्हणून काम केलं आहे. तुमचे माझे रक्ताचे जरी नाते नसले तरी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य बनवून तुमच्या सुख-दुःखात सहभागी होण्याबरोबरच मतदारसंघाच्या विकासासाठी तुमच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न केले. निवडणुकीत मला मतरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा काम करण्याची संधी द्यावी, असे भावनिक आवाहन आ. प्रकाश आबिटकर यांनी अण्णाभाऊ उद्योग समूहाचे अशोक अण्णा चराटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात केले. यावेळी अशोक अण्णा चराटी यांचा वाढदिवसानिमित्त आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार झाला.
आ. आबिटकर म्हणाले, आजरा शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. आजरा शहराला आवश्यक पाणीपुरवठा योजना, रवळनाथ देवालय, गंगामाई वाचन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुस्लिम समाज सभागृह, डॉ. आंबेडकर भवन, उपजिल्हा रुग्णालय, आजरा एमआयडीसी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात आले असून आचारसंहितेनंतर या कामाचा देखील प्रारंभ करण्यात येईल.
अशोक अण्णा चराटी म्हणाले, आमदार आबिटकर यांनी आजरा शहराच्या विकासासाठी शंभर कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अंशुमाला पाटील, अनिकेत चराटी, रमेश कुरुनकर, विलास नाईक, दीपक सातोस्कर, दशरथ अमृते, अतिश देसाई, बाळ केसरकर, राजेंद्र सावंत, राजाराम पोतनीस, मारुती मोरे, अनिरुद्ध केसरकर, बंडोपंत चव्हाण, डॉ. संदीप देशपांडे, पी. बी. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक उद्योजक विजयकुमार पाटील यांनी केले. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले.