

कसबा बावडा : राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून, जन्मस्थळ परिसरातील जागेचा प्रश्न, आवश्यक सुविधा व विकास आराखड्याबाबत येत्या आठवडाभरात संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री आबिटकर यांनी दिले. लक्ष्मी विलास पॅलेस शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन, विकास समितीचे इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्मस्थळ विकास समितीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन
कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.