

कोल्हापूर : सत्तेसाठी हालचालीची काहीही गरज नाही. जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला. त्यासाठी लवकरच बैठक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आम्ही महायुती म्हणून सत्तेत आहोत, तरीही जिल्हा परिषद, पंचायत समितीला जिथे शक्य आहे तिथे स्वतंत्र लढू. जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू असे ठरले होते. आता लढाया झाल्या, आम्ही पुन्हा एकत्र आलो. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडेच आहे. यामुळे सत्तेसाठी हालचाली करायची काही गरज नाही. सध्या निवडून आलेले लोक विजयाचा आनंद घेत आहेत. यामुळे लवकरच फार्म्युल्यासाठी बैठक घेऊ, असे आबिटकर यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासत नाही. त्याची आवश्यकताही नाही. सतेज पाटील म्हणतात तसे काही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निकालानंतर महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र येऊ आणि त्या सूत्राप्रमाणे आम्ही जिल्ह्यात महायुती म्हणून सत्ता स्थापन करू, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेची निवडणूक झाली आहे. त्यातील सदस्य व नगरसेवकच जिल्हा नियोजन समितीत सदस्य असतात. यामुळे त्यांच्याही लवकरच निवडी होतील, असेही आबिटकर यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयातील मोफत उपचारांसंदर्भात अधिकार्यांकडून दुरुस्ती करण्यात आली आहे, तसे आदेश काढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदस्यांचे राजपत्र प्रसिद्ध
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांचे राजपत्र बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. गुरुवारी त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. निवडून आलेल्या या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी पुण्याच्या शासकीय मुद्रणालयाला पाठविण्यात आली. दुपारनंतर राजपत्र छपाईचे काम सुरू झाले होते. राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती पदांसह विविध समित्यांचे सभापती, सदस्य निवड प्रक्रिया आणि त्यानंतर सर्वसाधारण सभा होणार आहे.
आम्ही महायुतीसोबतच : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला होता. यामुळे महायुतीचे घटक पक्ष असल्याने आम्ही महायुती सोबतच राहणार असल्याचे शिवसेनेचे सहयोगी आमदार, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. निर्णायक संख्याबळ आमच्याकडे आहे; पण महायुती जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहणार आहोत. आमचाही अध्यक्ष असावा, आम्हालाही पदे मिळावीत अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.