

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे दिला जाणारा २०२६ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक प्रभा गणोरकर यांना तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ युवा कवी रवी कोरडे यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठात लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली.
सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळसेकर कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. काव्य क्षेत्रातील मौलिक योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. आश्वासक कविता लेखन करणाऱ्या युवा कवीला देण्यात येणाऱ्या ‘ऋत्विज काळसेकर पुरस्काराचे’ स्वरूप दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह आहे.
अमरावती येथील प्रभा गणोरकर यांच्या ‘विवर्त’, ‘व्यतीत’ आणि ‘व्यामोह’ या कवितासंग्रहांना साहित्यविश्वात विशेष स्थान आहे. स्त्रीजीवनातील वेदना, आधुनिक स्त्रीचे प्रश्न तसेच निसर्गाविषयीचे संवेदनशील भान त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. छत्रपती संभाजीनगर येथील रवी कोरडे यांचे ‘धूसर झालं नसतं गाव’ आणि ‘भुंड्या डोंगरांचे दिवस’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रामीण जीवन, कृषी संस्कृती, मातीशी नाते आणि बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण त्यांच्या कवितेत आढळते. त्यांना यापूर्वी युवा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. निवड समितीत प्रा. नितीन रिंढे, प्रा. नंदकुमार मोरे व प्रा. रणधीर शिंदे यांचा समावेश होता.