

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील 110 के.व्ही. उपकेंद्राचा 61 लाख रुपयांचा कर न भरल्याने सोमवारी दुपारी चिपरी ग्रामपंचायतीने उपकेंद्राचे कंट्रोल रूम व प्रशासकीय कार्यालय सील केले. या घटनेनंतर शिरोळ तालुक्यातील 28 हून अधिक गावांतील विद्युतपुरवठा खंडित झाला. हा महावितरणचा रडीचा डाव असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर रात्री दहाच्या सुमारास 30 लाख रुपये भरण्याच्या लेखी अटीवर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागला. या प्रकाराबद्दल तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. चिपरी ग्रामपंचायतीचा 2000 पासून आजपर्यंत तब्बल 61 लाख 6 हजार रुपयांचा कर महापारेषण विभागाने भरलेला नाही. वारंवार कर भरण्याची व सील करण्याच्या नोटिसाही देऊन कर न भरल्याने सोमवारी दुपारी चिपरी ग्रामपंचायतीने 110 केव्ही उपकेंद्रातील कंट्रोल रूम, प्रशासकीय कार्यालयाला कुलूप घालून सील केले.
या कारवाईमुळे कोट्यवधीच्या मशिनचे नुकसान होणार असल्याने महापारेषणच्या अधिकार्यांनी गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडे धाव घेतली. मात्र, करापोटी निम्मी 30 लाख रुपये रक्कम भरल्यानंतर सील काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे चिपरी येथे ग्रामपंचायत प्रशासन आणि महापारेषण अधिकारी यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, सायंकाळपासून कुरुंदवाड परिसरातील 10 गावे वगळता शिरोळ तालुक्यातील कनवाड, कवठेगुलंद, शिरटी, शिरोळ, नांदणी, कोथळी, दानोळी, उदगाव परिसरातील 28 हून अधिक गावांतील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांनी महावितरणला जाब विचारायला सुरूवात केली; पण त्यांना थातुरमातुर कारणे सांगण्यात आली.
अखेर रात्री आठच्या सुमारास तहसीलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी नारायण घोलप हे चिपरी येथील 110 के. व्ही. उपकेंद्रावर दाखल झाले. त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी चिपरी ग्रामपंचायतीला केली. यावेळी ग्रामपंचायतीने थकीत कराची मागणी करत विषय रेटून धरला. अखेर महापारेषणच्या अधिकार्याने वरिष्ठांशी चर्चा करून 30 लाख रुपये कर भरण्याच्या लेखी अटीवर तोडगा निघाला. उर्वरित करही काही त्रुटी पूर्ण झाल्यानंतर भरण्यास अधिकार्यांनी संमती दर्शवली. त्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी सरपंच दीपिका परीट, उपसरपंच पांडव, तंटामुक्ती अध्यक्ष रणजित आवळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे, परशराम कांबळे, आनंदी जगदाळे, मोहन पांडव, संजय पांडव, ग्रामविकास अधिकारी सचिन कारकोले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.