

धीरज बरगे
कोल्हापूर : ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरता मर्यादित राहिलेला नाही. साडेचार हजार कोटींची उलाढाल असलेल्या या संस्थेवरील सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभाव, प्रतिष्ठा आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर पकड ठेवण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळेच गोकुळच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षात सहकार कायद्यातील बदलांपासून न्यायालयीन लढाईपर्यंत अनेक घडामोडी घडत आहेत. अखेर गोकुळच्या सत्तेत असे काय दडले आहे की, त्यासाठी सहकार कायद्यातही बदल केले जात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
गोकुळच्या सत्तासंघर्षात सहकार कायद्यात दोन वेळा बदल करण्याच्या हालचाली झाल्याचे चित्र समोर आले आहे. अ वर्ग सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देता येऊ नये, या भूमिकेतून कायद्यात बदल करण्यात आला. परिणामी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपताच चार मे २०२६ ला प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली.
दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत बहुमत मिळवले, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. संख्याबळाच्या या कौलातून सत्तेचा निर्णय स्पष्ट झाला. पण अध्यक्ष निवडीच्या वेळी गोकुळच्या पोटनियमातील कोरमची अट आडवी आली. २९ ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या सभेला १३ संचालक उपस्थित राहिले. मात्र आवश्यक १४ संचालकांचा कोरम पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवडीची सभा तहकूब झाली. बहुमत असूनही समविचारीला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले. याच पार्श्वभूमीवर शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संभाव्य बदलामुळे गोकुळच्या सत्तेचे गणित बदलू शकते.
सत्तेचे गणित आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न
गोकुळ म्हणजे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक कुटुंबांचे आर्थिक हित, ग्रामीण भागातील सहकाराचे जाळे, रोजगार आणि राजकीय प्रभाव यांचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता हातात असणे म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी स्थान कायम ठेवण्याची संधी. यामुळेच दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची लढाई लढली गेली. निवडणूक प्रक्रियेत सर्वच पातळीवर संघर्ष झाला. महायुतीला बहुमत मिळवता आले नाही. हा पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसते. त्यामुळे अध्यक्षपदाचा तिढा सोडविण्यापेक्षा सत्तेचे गणित आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.