

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक धामधूम शिगेला पोहोचली असून, पोस्टल मतदानाच्या प्रक्रियेला शनिवार (दि. 10) पासून सुरुवात होत आहे. शनिवार व रविवार (दि. 11) रोजी सलग दोन दिवस पोस्टल मतदान होणार असून, सातही निवडणूक कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत सुमारे 850 निवडणूक कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने निवडणूक यंत्रणा पूर्णतः सक्रिय झाली आहे. निवडणूक दिवशी सुमारे 3 हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार असल्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी 850 कर्मचार्यांनी अर्ज केले आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टल मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मतपत्रिका तयार असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, सातही निवडणूक कार्यालयांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये मतपत्रिका घालणे व प्रोग्रॅम सेटिंगचे काम जोरात सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी, तंत्रज्ञ आणि निवडणूक कर्मचारी यांच्यात सतत समन्वय साधत ही प्रक्रिया पार पडत आहे. कार्यालयांमध्ये सकाळपासून उशिरापर्यंत लगबग दिसून येत असून निवडणूक यंत्रणा अक्षरशः युद्धपातळीवर काम करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना प्रचार रॅली, सभा, मिरवणूक व ध्वनिवर्धक वापरासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया देखील वेगात सुरू आहे.
यासाठी एकखिडकी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, परवानग्यांसाठी येथे मोठी गर्दी होत आहे. निवडणूक प्रचाराला वेग येत असताना शहरातील प्रत्येक भागात रॅली, प्रचारफेरी आणि जनजागृती उपक्रमांमुळे वातावरण पूर्णतः निवडणूकमय झाले आहे. महापालिकेच्या सातही निवडणूक कार्यालयांतील निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत. निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन आणि दक्षता घेतली जात असून शांततापूर्ण व पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे.