

शिरढोण : बिरु व्हसपटे
पंचगंगा नदीपात्रात ऐन महापुरातही सोडण्यात रसायनमिश्रित उग्र वासाचे सांडपाण्या बाबत दै. पुढारीतून सडेतोड वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी शिरढोण, टाकवडे, तेरवाड, नांदणी पंचगंगा नदीपात्र आणि परिसरातील पाण्याची पाहणी करून त्याचा पंचनामा केला. यावेळी पुरबाधित शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व संतोष हत्तीकर यांनी धारेवर धरत सरबत्ती केली.
यावेळी महापुरामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रदूषित पाण्यामुळे आमची शेतातील पिके, बुडालेली घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत संताप व्यक्त केला. यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले तसेच सांडपाण्याचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी सागर टाकवडे, रावसाहेब यमकणमर्डे, सागर हुलमूजगे, विलास बिरोजे, सागर दानोळे, आदींसह शेतकरी उपस्थित होते. महापुराच्या पाण्यामुळे आधीच त्रस्त असणाऱ्या लोकांना प्रदूषित पाण्यामुळे संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. महापुरामुळे नदी काठावरील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत.हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आहेत.अशातच हे रसायनमिश्रित सांडपाणी आल्याने काठावरील ऊस पिकांना मोठा फटका बसला आहे.महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा आरोप लोक करत आहेत.
शिरढोण, टाकवडे,नांदणी तेरवाड बंधारा याठिकाणी पंचगंगा नदीपात्र व साचलेल्या पुराच्या पाण्याला उग्र वास व काळाकुट्ट तवंग आला आहे. नदीपात्रात मध्यभागी महापुराच्या पाण्याला लाला तर पात्राच्या दोन्ही बाजूला काळा तवंग वाहताना दिसत आहे. त्यामुळे महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.