

धीरज बरगे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’मध्ये निवडणूक, संस्था सुनावणीमधून सुरू असलेले राजकारण आता दैनंदिन संकलनातही घुसल्याची चर्चा आहे. प्रशासक नियुक्तीनंतर दैनंदिन संकलनात टप्प्याटप्प्याने सुमारे 1 लाख लिटरची घट झाली. प्रशासकांनी इतरत्र दूधपुरवठा करणार्या दूध संस्थांना ‘गोकुळ’कडून पुरविल्या जाणार्या सेवा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर दोन दिवसांत संकलनात 50 हजार लिटरची वाढ झाली. महिनाभरातील आकडेवारी पाहता दूध संकलनामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारावरून वाढत्या उष्म्यामुळे दूध संकलनात घट झाली की, राजकारणातून?, असा प्रश्न सर्वसामान्य दूध उत्पादकांना पडला आहे.
गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपल्याने इतिहासात प्रथमच गोकुळवर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. यामुळे गोकुळमधील राजकीय वातावरण आणखीनच तापले. सत्ताधारी काळातील काही व्यवहारांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता दूध संकलनाचा मुद्दा पुढे आला आहे. उन्हाळ्यात प्रतिवर्षी दूध संकलनात घट होतेच त्यानुसार यंदाही झाली. पण, यंदाची घट उष्म्यामुळे झाली का राजकारणातून अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.
वीस दिवसांत 1 लाख लिटरची घट
मे महिन्याच्या सुरुवातील ‘गोकुळ’चे दैनंदिन दूध संकलन सुमारे 16 लाख 49 हजार लिटर इतके होते. 4 मे रोजी संचालकांची मुदत संपल्यानंतर सायंकाळी लागलीच प्रशासकांनी गोकुळचा कारभार हाती घेतला. यानंतर मात्र दूध संकलनात घट होत गेली. वीस दिवसांत 15 लाख 51 हजार लिटर सर्वात कमी संकलनाची नोंद आहे. आकडेवारी पाहता सुमारे 1 लाख लिटरची घट दिसून येते.
इशार्यानंतर 50 हजार लिटरची वाढ
संकलनात घट झाल्याने प्रशासक मंडळाने इतरत्र दूध पुरवठा करणार्या संस्थांना गोकुळकडून पुरविल्या जाणार्या सेवा बंद करण्याचा इशारा दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी पाहता संकलनात सुमारे 50 हजार लिटरची वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
दैनंदिन दूध संकलनातील चढ-उताराची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
(आकडेवारी लिटरमध्ये)
30 एप्रिल : सुमारे 16 लाख 52 हजार
18 मे : 15 लाख 51 हजार
20 मे : 15 लाख 61 हजार
21 मे : 15 लाख 99 हजार
22 मे : 15 लाख 99 हजार