

कोल्हापूर ः जिल्हाप्रमुख पदावरून ठाकरे शिवसेनेत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीचे नाट्य संपलेले नाही, तोवर इचलकरंजी भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. इचलकरंजी महानगर भाजप अध्यक्षपदावरून प्रकाश आवाडे विरुद्ध सुरेश हाळवणकर असा नवा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूरच्या शिवसेनेत सुरुवातीपासूनच असंतोष धगधगत आहे. तो आजअखेर कायम आहे. पक्षाच्या नेत्यांनी या असंतोषाकडे फारसे गांभीर्याने कधी पाहिले नाही. स्थापनेनंतर लगेचच हा संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला चंद्रकांत साळोखे विरुद्ध रामभाऊ चव्हाण, पुढे चव्हाण विरुद्ध राजेश क्षीरसागर, क्षीरसागर विरुद्ध संजय पवार आणि आता संजय पवार विरुद्ध रविकिरण इंगवले असा नवा संघर्ष सुरू झाला. पदाधिकारी कोणालाही नेमा, संघर्ष अटळ आहे. एकेकाळी जिल्ह्यातील 10 पैकी सहा आमदार शिवसेनेला मिळाले तरीही मंत्रिपद मिळाले नाही. एकाचे नाव आले की, इतर पाचजणांनी एकत्र यायचे या अंतर्गत वादात संघटना मागे पडली. सहा आमदारांची संख्या एकवर आली. पुढे तर शिवसेनेतच फूट पडली. आता उद्धव ठाकरे गटाचा एकही लोकप्रतिनिधी विधानसभेत नाही. त्या त्यावेळच्या संपर्कप्रमुखांनी योग्य दखल न घेतल्याने आणि वरिष्ठ नेत्यांनीही सोयीनुसार स्थानिकांचा वापर केल्याने संघटना खिळखिळी झाली. याचा फटका सुरेश साळोखे आणि क्षीरसागर यांनाही बसला आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे सेनेचे तीन आमदार निवडून आले. एका स्वतंत्र उमेदवाराने त्यांना पाठिंबा दिला. पालकमंत्रिपद शिंदे शिवसेनेकडे असूनही अंतर्गत वादातून त्यांनाही आपला प्रभाव पाडता आलेला नाही. कोल्हापूर शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केले. त्यामुळे पक्षाला बळ मिळाले आहे. मात्र पालकमंत्रिपद शिंदे शिवसेनेकडे असूनही संघटना म्हणून अद्याप म्हणावा तसा प्रभाव नाही. हा धुमसता संघर्ष थांबवत असतानाच आता इचलकरंजी भाजपमध्ये संघर्षाची बीजे रोवली आहेत. इचलकरंजी महानगर भाजप अध्यक्ष निवडीवरून हा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे महानगर अध्यक्षपदाच्या निवडी झाल्या नव्हत्या. भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी या निवडी जाहीर केल्या. बाळासाहेब माने, श्रीरंग खवरे आणि शशिकांत मोहिते यांच्या निवडी झाल्या आहेत. मात्र हाळवणकर यांना या निवडीत स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. यापूर्वी त्यांना विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवर स्थान देण्याचे सांगण्यात आले होेते. तेही न मिळाल्याने ते अगोदरपासूनच नाराज आहेत. त्यात या नाराजीची भर पडली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर तिथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. खासदार धैर्यशील माने शिंदे शिवसेनेचे तर आमदार राहुल आवाडे भाजपचे आहेत. आता पक्षांतर्गत नाराजी दूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यापूर्वी निवड आणि नियुक्त्यांवरून झालेली अस्वस्थता दूर करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.
ठाकरे शिवसेनेत रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी झालेली निवड अंतर्गत संघर्ष उफाळण्याला कारणीभूत ठरली. संजय पवार यांनी थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिला. हर्षल सुर्वे यांनी पक्षच सोडला. मात्र इंगवले यांच्या निवडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिले. यामागे महापालिकेची गणिते आहेत तसेच पुढच्या निवडणुकीचाही विचार आहे. आता या दोघांचाही खरा कस लागणार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच.
भाजपमध्येही जिल्हाध्यक्ष निवडीवरून अंतर्गत संघर्ष सुरू झाला. विजय जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होणे हे महाडिक गटाला रुचले नव्हते. यातून संघर्ष धुमसत होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा सक्रिय करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लक्ष घातल्याचे सांगण्यात आले. पाटील यांनी मेळावा घेऊन पक्षाला कोल्हापूर महापालिकेत 81 पैकी 33 जागा मिळाव्यात अशी थेट मागणी केली. महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची, असेही पाटील यांनी सूचित केले.