

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय हालचाली वेगवान झाल्यात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीतील घटक पक्षात पक्ष मजबूत करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यातूनच पक्षप्रवेशाचे सोहळे घडवून आणले जात आहेत. त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन केले जात आहे. महायुती म्हणून भाजप, शिंदे सेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र असले तरी त्यांच्यात पक्षवाढीची अंतर्गत चुरस मोठी आहे.
कोल्हापुरात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात झाल्या. ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार जयश्री जाधव या शिंदे सेनेत दाखल झाल्या. राधानगरीतून विधानसभा निवडणूक उद्धव सेनेकडून लढविलेले बिद्री साखर करखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील अजित पवार राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. शिवसेनेचे दोन वेळचे माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे व्हाया स्वाभिमानी शेतकरी संघटना शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. उल्हास पाटील व संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची केवळ चर्चाच झाली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेच्या प्रचारात सक्रिय राहिले. सत्यजित कदम भाजपमधून शिंदे सेनेत दाखल झाले.
महायुतीच्या नेत्यांची ताकद वाढली. एक खासदार व दहा आमदार जनतेने निवडून दिले. युतीच्या नेत्यांना कायम दुष्काळी वाटणार्या या भागाने एकगठ्ठा ताकद महायुतीच्या मागे उभी करून दिली. मात्र, विधान परिषद निवडणुकीत कोल्हापूरची केवळ चर्चाच झाली. सुरेश हाळवणकर यांना भाजपकडून, तर अरुण डोंगळे यांना शिंदे सेनेकडून विधान परिषदेसाठी शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राला या पाच सदस्यांच्या निवडीत विधान परिषदेवर स्थान मिळालेले नाही. पुणे जिल्ह्यातून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक मानकर, तर महिलांमधून रूपाली चाकणकर हे अजित पवार राष्ट्रवादीकडून दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांचीही विधान परिषद यावेळी हुकली आहे.
भाजप व शिंदे सेनेपाठोपाठ आता अजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ज्यांचे नाव घेतले जाते ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप व राजेंद्रअण्णा देशमुख हे अजित पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अलिकडेच त्यांची मिरजेत माजी मंत्री अजितराव घोरपडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. स्वत: अजित पवार हेही नाईक, जगताप व देशमुख यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान माजी खासदार संजय पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेत पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
सांगली जिल्हा अशा पक्षप्रवेशाच्या चर्चेने गाजत असतानाच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष व काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटील यांना थेट भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या आढावा बैठकीत विशाल पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिली.
राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावे लागते. पुढे काय होईल माहिती नाही. म्हणून खासदार विशाल पाटील यांनी भाजपत यावे. ते आमच्यासोबत आले तर केंद्रातील आमची संख्या वाढेल व त्यांनाही जिल्ह्यातील विकासकामे करणे सोपे जाईल. म्हणून आम्ही त्यांना पुन्हा जाहीर ऑफर देत असल्याचे चंद्रकांत पाटील जाहीरपणे म्हणाले. त्यावर बोलताना खासदार विशाल पाटील यांनी त्यांचे व आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. आपल्या कामाची पद्धत आवडल्यामुळे त्यांनी ऑफर दिली असेल. आपण मात्र अपक्ष म्हणूनच काम करणार असून त्यांच्याकडून आलेली ऑफर म्हणजे आम्ही आमची कामे चांगली करतो याची पोचपावतीच असल्याचे विशाल पाटील म्हणाले.
कोल्हापूर आणि फुटबॉल हे समीकरणच आहे. फुटबॉल शौकिनांनी डोक्यावर घेतलेला हा खेळ व त्याची लोकप्रियता कॅच करण्यासाठी नेत्यांकडून फुटबॉलचे सामने भरविण्याची स्पर्धा लागली आहे. ओसंडून वाहणारे स्टेडियम, उत्कंठावर्धक सामने या माध्यमातून नेत्यांना जनतेपुढे जाण्याची चांगली संधी मिळते. विशेषतः यंग ब्रिगेडला आकर्षित करण्यासाठी फुटबॉलच्या माध्यमातून सध्या कोल्हापुरात नेत्यांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे.