

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे यांना पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले. कोल्हापूर पोलिसांना यंदा एकमेव पदक मिळाले आहे. शिंदे हे सध्या विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयामध्ये वाचक शाखेत कार्यरत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांसह राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण विभागामध्येही सेवा बजावली आहे. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. बास्केटबॉल, हॉकी, ॲथलेटिक्स अशा क्रीडा प्रकारात त्यांनी सुवर्ण, रौप्य पदाकांची कमाई केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी पोलिस दलात उत्तम कामगिरी बजावत 175 बक्षिसे मिळविली आहेत. त्यांच्या या कामगिरीने त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हानेही गौरविण्यात आले आहे.