कोल्हापूर : जिल्ह्यातील पोलिस शिपाईपदाच्या रिक्त 88 जागांसाठी शुक्रवार (दि. 13) पासून भरती प्रक्रिया होत आहे. पोलिस परेड मैदान येथे पहाटे साडेपाच वाजता शारीरिक चाचणीला सुरुवात होईल. 1,600, 800 आणि 100 मीटर धावण्याचे ट्रॅक, गोळाफेकसाठीचे मैदान, कागदपत्र पडताळणीसाठी 11 ठिकाणी टेंट अशी पोलिस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 6,853 उमेदवार कौशल्य पणाला लावणार आहेत. भरतीच्या पहिल्या दिवशी 700 उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. 21 फेबुवारीदरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 15 रोजी रविवार आणि 19 रोजी शिवजयंतीची सुट्टी असल्याने प्रक्रिया बंद राहणार आहे.
सीसीटीव्ही, बायोमेट्रिक हजेरी
प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिस परेड मैदान येथे सीसीटीव्ही लावले आहेत. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण होणार आहे. उमेदवारांची चाचणी प्रक्रियेसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे. पोलिस परेड मैदानासह परिसरात तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी बंदी आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपतीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.
अशी होणार शारीरिक चाचणी
11 टेबलांवर होणार कागदपत्रांची पडताळणी
छाती व उंचीचे मोजमाप होईल
1,600 मीटर धावणे पुरुषांसाठी
800 मीटर धावणे महिलांसाठी
(छ. राजाराम कारखाना चौक ते शिये पूल)
पोलिस परेड मैदान येथे गोळाफेक
100 मीटर धावणे