

कोल्हापूर : जिल्ह्यातील पोलिस शिपाई पदाच्या रिक्त 88 जागांसाठी शुक्रवारपासून (दि. 13) भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी 6 हजार 853 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलिस परेड मैदान येथे पहाटे 5 ते दु. 12 वाजेपर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी हाईल. 21 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. भरती प्रक्रियेसाठी पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ते 75 वरिष्ठ अधिकारी, 250 अंमलदार असा 300 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.
पोलिस दलातील जिल्ह्यातील रिक्त 88 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 6,853 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 5007 पुरुष, 1672 महिला आणि 174 माजी सैनिकांचा समावेश आहे. दररोज 700 ते 1 हजार जणांच्या मैदानी चाचण्या होतील. 11 टेबलवर मैदानी चाचणी होणार्या उमेदवारांची प्रथम पडताळणी होईल. 15 व 19 फेब्रुवारीची सुट्टी वगळता 21 फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी बायोमेट्रिक फेसिंगचा वापर आणि सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.
पोलिस परेड मैदानावर उमेदवारांची थाळीफेक, गोळाफेक, उंचउडी, लांबउडी अशी मैदानी चाचणी होईल. बावडा-शिये रोडवरील छ. राजाराम कारखाना चौक ते शिये पुलापर्यंत धावण्याची चाचणी होणार आहे.