

उजळाईवाडी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी हद्दीत करवीर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा वेश्या व्यवसाय करणाऱ्या ‘आरंभ’ आणि ‘बारकोड’ या दोन लॉजवर छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका केली, तर लॉज मालक शंकर आनंदा खोत (वय ४५, रा. कणेरीवाडी) आणि एजंट कल्लेश चंद्रकांत खेकरे (वय ३८, रा. पुलाची शिरोली) या दोघांना अटक केली.
कणेरीवाडी हद्दीतील लॉजवर वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार यांना मिळाली होती. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.
‘आरंभ’ लॉजवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी वाळवा तालुक्यातील एका ३२ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली. या ठिकाणाहून ५,७०० रुपये रोख, मोबाईल आणि डीव्हीआर जप्त करण्यात आला. यानंतर पथकाने ‘बारकोड’ लॉजवर छापा टाकून जळगाव जिल्ह्यातील एका ३३ वर्षीय पीडित महिलेची सुटका केली. या लॉजमधून २,३०० रुपये रोख, ६,००० रुपयांचा मोबाईल आणि ३,००० रुपयांचा डीव्हीआर असा मुद्देमाल हस्तगत केला.