

कोल्हापूर : हरी ओमनगर येथील ओढ्याजवळ मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, तीन मोबाईल हँडसेट, दुचाकी असा 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईमध्ये ओमकार सोपान वीर (वय 34, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर), प्रकाश वसंत हडदरे (33, रा. आपटेनगर), जुबेर अब्दुल पठाण (31), अनिल अशोक ढवळे (33), गजानान सौदागर शिंदे (45, तिघे रा. राजोपाध्येनगर) यांना पोलिसांनी अटक केली. हरी ओमनगर येथे तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथे छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 1600 रु. रोख रक्कम, 15 हजाराचे तीन मोबाईल, 1 लाखाची मोपेड असा 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत कॉन्स्टेबल संदीप घाटगे यांनी फिर्याद दिली.
महिनाभरात दुसरा छापा
हरीओमनगर येथे असलेल्या मोकळ्या जागेचा फायदा घेत येथे जुगार खेळला जातो. महिनाभरापूर्वीही येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा याच परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे.