

कोल्हापूर : तामगाव (ता. करवीर) येथे फार्महाऊसवर सुरू असलेल्या डान्स बारवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये सुमारे १२ नशेखोरांसह सहा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सराईत गुन्हेगार, शहरातील एका नगरसेवकाचा भाऊ, मटका-जुगार व्यावसायिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अनेक फार्महाऊसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तामगाव येथील फार्महाऊसवर डान्सबार पार्टी रंगल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री फार्म हाऊसमध्ये छापा टाकला. त्यावेळी फार्म हाऊसमध्ये डान्स पार्टीचे आयोजन केल्याचे आढळले. चार ते पाच महिला नृत्य करीत होत्या. तसेच दहा ते बारा जण मद्यप्राशन करीत बसले होते. फार्महाऊसमध्ये डान्सबार थाटल्याचे लक्षात येताच पोलिसांनी महिलांसह १५ ते २० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, फार्म हाऊसमध्ये अवैध प्रकार चालवणाऱ्या फार्महाऊस चालकांचे धाबे दणाणले आहेत.
अमली पदार्थांच्या वापराचा संशय
डान्सबार पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. संशयितांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघडकीस आल्यास त्यांनी अमली पदार्थ कोणाकडून आणले होते, त्याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
गोकुळ शिरगाव पोलिस अनभिज्ञ
कारवाई केलेले फार्महाऊस गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र या प्रकाराची गोकुळ शिरगाव पोलिसांनी पुसटशीही कल्पना नव्हती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना कारवाईची माहिती मिळाली. यानंतर अधिकारी, कर्मचारी धावत-पळत घटनास्थळी दाखल झाले.