

कोल्हापूर ः ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिका आणि अभियंत्याला 11 कोटींहून अधिक रकमेचा गंडा घालणार्या सायबर चोरांच्या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आठ संशयितांना ताब्यात घेतले असून लवकरच आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करू, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
डिजिटल अरेस्टची भीती घालून सायबर भामट्यांनी निवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना दीड महिन्यापूर्वी 3 कोटी 57 लाखांचा गंडा घातला. पाठोपाठ दत्तात्रय पाडेकर (रा. तात्यासाहेब मोहिते कॉलनी, कोल्हापूर) यांना दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याच्या कारणातून अटकेची धमकी देऊन त्यांच्याकडून 7 कोटी 86 लाख रुपये उकळले. सायबर भामट्याच्या दोन्हीही गुन्ह्यांत साध्यर्म आहे. शिवाय तपास पथकांच्या चौकशीत पुण्यासह अन्य शहरांतील संशयितांची नावे निष्पन्न होत आहेत. वृद्धांना डिजिटल अरेस्टची भीती घालून कोट्यवधीच्या रकमा उकळणारी टोळी सराईत असू शकते. तपास गतिमान करून कोल्हापूर पोलिसांनी टोळीच्या कारनाम्यांचे धागेदोरे उघडकीस आणले. डोंगरे यांना साडेतीन कोटींहून अधिक रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी पाच, तर पाडेकर यांच्या गुन्ह्यात 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. वर्ग झालेली 50 लाखांची रक्कमही गोठविल्याचे गुप्ता म्हणाले.
वृद्धांच्या आर्थिक उलाढालीची माहिती देणारी यंत्रणा स्थानिक पातळीवर आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. स्थानिक पातळीवर गरजूंना पाच-दहा हजार रुपयांचे आमिष अथवा टक्केवारीचे कमिशन दाखवून त्यांच्या नावे बँकेत खाते उघडून गैरवापर झाल्याचा संशय आहे. काही स्थानिक एजंट सायबर भामट्याच्या संपर्कात असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.