

दिलीप भिसे
कोल्हापूर : शहर व जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या अमली पदार्थ तस्करांसह शस्त्रांच्या धाकावर गुंडागर्दी करणार्या टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी कोल्हापूर पोलिस दल अॅक्शन मोडवर आले आहे. रेकॉर्ड असलेल्या दीड हजारांवर गुंड मोका आणि तडीपारीच्या रडारवर आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, इचलकरंजीसह परिसरातील 250 समाजकंटकांवर कारवाईचा बडगा शक्य आहे. काळे धंदेवाल्यांसह जुगार्यांवरही विशेष पथकामार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात नशिल्या गोळ्यांसह गांजा तस्करीचे रॅकेट फोफावले आहे. वर्षभरात झालेल्या बहुतांशी गंभीर गुन्ह्यांतील संशयित 16 ते 20 वयोगटातील आहेत. यापैकी 25 ते 35 टक्के संशयित अमली पदार्थ सेवनाचे शिकार ठरल्याचे निष्कर्ष आहेत. नशिल्या गोळ्या आणि गांजाच्या झुरक्याशिवाय काही संशयितांची रात्र सरत नाही, अशी धक्कादायक स्थिती आहे.
20 ते 30 वयोगटातही अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. खून, खुनाच्या प्रयत्नासह दरोडे, लुटमारीच्या गुन्ह्यातही कोवळी पोर गुरफटली आहेत. पोटाच्या मागे धावणार्या पालकांनाही घोर चिंता लागून राहिली आहे.
व्यसनी मित्रांच्या संगतीने पोराचा पाय कधी चुकीच्या दिशेने पडेल, याचा भरवसा नाही ही वस्तुस्थिती आहे. शहर, जिल्ह्यासह राज्यात बहुतांशी शहरामध्ये अमली पदार्थ तस्करी आणि सेवनाचे लोणं फोफावत आहे. तस्करीतील उलाढाल रोखण्यासाठी शासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्धार केला आहे. त्यात प्रामुख्याने मोका आणि तडीपार कारवाईचा समावेश आहे.
तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या गुंडांना मोका, तडीपारीचे प्रस्ताव तत्काळ वरिष्ठांमार्फत सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. पोलिस दप्तरी दाखल नोंदीनुसार दीड हजारावर सराईत गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत. पहिल्या टप्प्यात काही दिवसात 250 गुन्हेगारांवर कारवाई शक्य होईल.