

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा धाक केवळ गुंडांना पोलिस ठाण्यात बोलावून दम देण्यापुरताच उरल्याचे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांतील घरफोड्या, गांजा, अवैध व्यवसायातील कारवाया पाहता कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडल्याचे दिसते. फाळकूट दादा, सराईत गुंडांच्या टोळ्यांची वळवळ वाढल्याने खून, मारामारीच्या घडणाऱ्या घटना आता थेट गोळीबारापर्यंत पोहोचल्या आहेत.
डीबी पथकांना इन्चार्जच नाही
शहरातील राजवाडा ठाण्यात एक वर्षापासून, लक्ष्मीपुरीत ९ महिन्यांपासून डीबी पथकांना इन्चार्ज नसल्याची माहिती आहे. शाहूपुरीतील अधिकाऱ्याची बदली झाली असून ते वारी बंदोबस्तात आहेत. राजारामपुरीतील इन्चार्जची बदली झाली असून त्या जागी नव्याने अधिकारी दिला आहे. वर्षानुवर्षे डीबी पथकात ठाण मांडेलल्या कर्मचाऱ्यांना बदलून नवे कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे.
पोलिस ठाण्यात हजेरीचा फार्स
पोलिस प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यात शहरातील सराईत आणि कुख्यात गुंडांची हजेरी घेतली. मात्र हा केवळ फार्सच ठरल्याचे दिसत आहे.
शस्त्र तस्करांची चलती
दीड वर्षात शहरात ५२ तलवारी, चाकू आणि एडके पोलिसांनी जप्त केले. तर ४५ शस्त्रेही हस्तगत केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शस्त्रे सापडत असतील तर ती येतात कुठून याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
गर्भलिंगाचे मारेकरी मोकाटच
गर्भलिंग गुन्ह्यावरून ६ महिन्यांत ४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये तेच आरोपी सापडत आहेत. तरीही पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर ‘मोका’अंतर्गत कारवाई केलेली नाही.
३०० किलो गांजा, एक किलो चरस
सहा महिन्यांत पोलिसांनी ४० कारवाया करून २०० किलो गांजा, ५० ग्रॅम अफू, एक किलो चरस जप्त केला. ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४० संशयितांना अटक केली आहे. कोल्हापुरात अमली पदार्थांचा मागणी तसा पुरवठा होत असल्यामुळे अनेक पेडलर यामध्ये ॲक्टिव्ह झाले आहेत. पोलिस मात्र छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करत आहेत. बडा सप्लायर शोधण्यात अद्यापही यंत्रणा अपयशी ठरत आहे.