

कोल्हापूर : उच्चभ्रू अन् पॉश परिसर अशी ओळख असलेल्या रुईकर कॉलनीतील कार्यालयात 200 सह 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणार्या टोळीचा मास्टर माईंड आणि कोल्हापूर पोलिस मोटार परिवहन विभागातील चालक तथा पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (44, रा. आंबे गल्ली, कसबा बावडा) याला पोलिस दलातून शनिवारी बडतर्फ करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी विनाचौकशी हा झटका दिला.
एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करून मिरज येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने पोलिस हवालदार इब्रार इनामदारसह पाच साथीदारांना बेड्या ठोकल्या. टोळीने रुईकर कॉलनीत भाड्याने घेतलेल्या सिद्धकला नावाच्या चहा व अन्य साहित्य विक्रीच्या कार्यालयात बनावट नोटांच्या छपाईचा अड्डाच सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला.
सांगली पोलिसांनी या कार्यालयावर छापा टाकून कलर झेरॉक्स मशिन, नोटा मोजण्याचे मशिन, स्कॅनर, प्रिंटरसह छपाई झालेल्या बनावट नोटांचे बंडल, कोरे कागद आदी साहित्य हस्तगत केले. या बनावट नोटा प्रकरणात कोल्हापूर पोलिस दलातील चालक तथा पोलिस हवालदाराचा थेट सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरला. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिस हवालदाराच्या कृत्याची गंभीर दखल घेतली. विनाचौकशी इनामदारला पोलिस दल सेवेतून बडतर्फ करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
इब्रार इनामदार 2006 मध्ये कोल्हापूर पोलिस दलात भरती झाला. एक वर्षानंतर म्हणजे 2007 मध्ये तो सेवेत हजर झाला. भरती झाल्यापासून पोलिस दलातील त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. देवकर पाणंद येथील समीर माधवराव मोहिते यांनी जानेवारी 2025 मध्ये इनामदार याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाची तक्रार केली होती. तथापि पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मोहिते यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतल्यानंतर अदखलपात्र गुन्हा म्हणून त्याची नोंद केली. इनामदारने खाकी वर्दीचा गैरवापर करूनही त्याला पाठीशी घालण्याचे कृत्य त्याच्या काही सहकारी मित्रांनी केल्याची शनिवारी दिवसभर चर्चा होती.
पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार याचे कृत्य देशविघातक असल्याचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. संशयिताने महाराष्ट्र नागरी सेवा 1979 मधील तरतुदींचा भंग करून संशयास्पद सचोटी, संशयास्पद वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलीन केली आहे. पदास अशोभनीय गैरवर्तन केले आहे. कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असतानाही भारतीय न्यायसंहिताच्या कलमामधील तरतुदींचा भंग करून बनावट भारतीय चलन तयार करणे, विक्री व वापरणे हा गुन्हा असतानाही गैरकृत्य केल्याचे म्हटले आहे. बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक झाल्याने त्यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश पत्रात म्हटले आहे.