

कोल्हापूर : आवाज मर्यादेचे पालन करून दोन बेस, दोन टॉपला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र मिरवणुकीच्या नावाखाली काही तरुणांकडून केली जाणारी हुल्लडबाजी खपवून घेऊ नका. आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे साऊंड सिस्टीम जागेवर जप्त करा, असे आदेश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी रविवारी दिले.
राजारामपुरी आगमन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे वाटप व्ही. टी. पाटील सभागृहात झाले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अण्णासो जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे, पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, विकास जाधव उपस्थित होते. बंदोबस्त वाटपानंतर मंडळांच्या स्ट्रक्चरची तपासणी केली. अवाढव्य स्ट्रक्चर न उभारता १० बाय १२ फुटाचेच स्ट्रक्चर आणावेत, अशा सूचना पोलिसांनी केल्या. प्रेशरमीड, सिओटू, लेसरला बंदी असून याचा वापर केल्यास जागेवर जप्त करावे. प्रत्येक मंडळाच्या स्ट्रक्चरची मर्यादा तपासा, अशा सूचनाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर वॉच ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
३०० अधिकारी, कर्मचारी
आगमन मिरवणूक ही विसर्जन मिरवणुकीची झलक असते. यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ३ पोलिस उपअधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २३ अधिकारी, १३० अंमलदार, जलद कृती दल २ तुकड्या, १०० होमगार्ड तैनात असणार आहेत.
सिग्नलसह सीसीटीव्ही चाचणी...
मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी मंडळांना प्रत्येकी २० मिनिटे एका जागी थांबण्याची मुभा असणार आहे. यासाठी पाच ठिकाणी सिग्नल उभारण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्हीची नजरही राहणार आहे.