

पेठवडगाव: पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून नियमित सराव करणाऱ्या किणी गावातील सुशांत सुरेश पोवार (वय २३) या युवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (दि.२८) पहाटे पुणे-बंगळूरू महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ ही घटना घडली.
सुशांत हा कबड्डीचा अष्टपैलू खेळाडू होता आणि पोलीस भरतीसाठी दररोज ट्रेकिंग व सराव करत असे. सोमवारी (दि.२८) पहाटे तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून कासारवाडीच्या डोंगर भागात ट्रेकिंगसाठी निघाला होता. मंगरायाचीवाडी फाट्याजवळ दुचाकी साईड पट्टीवरून मुख्य रस्त्यावर घेत असताना ती स्लिप झाली आणि सुशांत रस्त्यावर पडला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेले.
घटनेनंतर त्याच्या मित्राने तातडीने त्याच्या प्रशिक्षकांना माहिती दिली. १०८ रुग्णवाहिका बोलावून सुशांतला कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सुशांतने कबड्डीच्या अनेक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला होता. त्याचा शिस्तबद्ध सराव, मेहनती स्वभाव आणि पोलीस भरतीसाठीची जिद्द गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी होती. मात्र नियतीने त्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच हिरावून घेतले. या दुर्दैवी घटनेमुळे किणीसह परिसरातील गावात शोककळा पसरली असून, अपघाताचे वृत्त समजताच गावातील व्यवहार काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते.