Kolhapur violence | संयम राखा, सामाजिक सलोखा जपा
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांची ही समतेची नगरी आहे. किरकोळ कारणांवरून कायदा हातात घेऊन शहराची शांतता भंग करू नका. गुन्हे दाखल झाल्यास सुशिक्षित तरुणांचे भविष्य धोक्यात येईल. तुम्ही सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी घ्या, आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी देतो, अशा शब्दांत पोलिस प्रशासनाने शनिवारी दोन्ही समाजांतील नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले.
सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसर दंगलप्रकरणी शनिवारी सकाळी पोलिस प्रशासनाने दोन्ही समाजांतील लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी शांतता बैठक घेऊन सूचना केल्या. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू म्हणाले, कोल्हापुरात हिंदू व मुस्लीम समाजात सामाजिक सलोखा आहे; परंतु शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून यास गालबोट लागले. कायदा हातात घेतल्यावर पोलिस गुन्हे दाखल करतील. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील म्हणाल्या, किरकोळ कारणावरून घडलेल्या घटनेला मोठे स्वरूप आले. येथून हाकेच्या अंतरावर सर्किट बेंच इमारत आहे. शाहू महाराजांच्या नगरीत सर्वच जाती- धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. दोन्ही समाजांनी सामंजस्याने राहावे. भविष्यात असा प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेऊया. पोलिस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. चुकीचे प्रकार होत असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर म्हणाले, विनापरवाना फलक लावू नका, असे पोलिसांनी सांगितले होते; पण काही हुल्लडबाज तरुणांनी केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने असा प्रकार केल्याचे दिसून येते. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी.
राजेबागस्वार दर्गा येथील शेडमध्ये बोलावलेल्या बैठकीस लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, आदिल फरास, कादर मलबारी उपस्थित होते. सिद्धार्थनगर येथील बैठकीत सुशीलकुमार कोल्हटकर, स्वप्निल पन्हाळकर, मंगेश कांबळे, जय पटकारे, डॉ. शशिकांत खोडसे, स्वाती काळे, सीमा कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी सिद्धार्थनगर कमानीजवळील कायमचा नाहक त्रास बंद करण्याबाबत नागरिकांकडून मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
दगडाला दगडाने उत्तर नको...
एका गटाने दगडफेक केली म्हणून दुसर्या गटाने हातात दगड घेणे चुकीचे आहे. दगडाला दगडाने उत्तर नको. अनेक वर्षे समोरासमोर राहणार्या बांधवांमध्ये आजपर्यंत कधीच वाद, दगडफेक झाली नाही. काही हुल्लडबाज तरुणांमुळे हा प्रकार घडला. ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक डॉ. बच्चू यांनी केले.
सोशल मीडियातून बाहेर पडा...
सध्या सोशल मीडियावर मूळ व्हिडीओची मोडतोड करून काही आक्षेपार्ह व्हिडीओ, क्लिप तयार करून ती व्हायरल केली जात आहे. यामुळेच जातीय तेढ, दोन गटांत मारामारीचे प्रकार घडत आहेत. तरुणांनी अशा क्लिपवर विश्वास ठेवू नये. त्याची सत्यता पडताळून पाहावी, अशा सूचना पोलिस अधिकार्यांनी केल्या.

