kolhapur | शुभमंगल सावधान... पोलिस आले अन् वर्‍हाडी पळाले

वधू होती अल्पवयीन : अक्षतापूर्वीच येणेचवंडीत पोलिस, बालविवाह प्रतिबंध समितीची कारवाई
kolhapur | शुभमंगल सावधान... पोलिस आले अन् वर्‍हाडी पळाले
Published on
Updated on

प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज : लग्न म्हटले की धामधूम आलीच. येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथेही असेच काहीसे वातावरण दुपारी 12.36 च्या मुहूर्तासाठी होते. काल उत्साहाने हळद दळली अन् आज एक हजार लोकांच्या जेवणाचा बेत... मांडवात दिग्गज लोकांची मांदियाळी... वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी जमलेली मोठी गर्दी. पण मुहूर्ताला अवघा अर्धा तास बाकी असताना पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजला अन् आनंदाच्या मंडपात जणू बॉम्बच फुटला. नवरी अल्पवयीन असल्याने याबाबतची तक्रार बालविवाह प्रतिबंधक समितीला अज्ञाताने केल्यावर समितीसह पोलिसांनी थेट मांडवात एंट्री केली. त्यांनी व्हिडीओ शूटिंग करताच मग उपस्थितांना कळाले, काहीतरी घोटाळा आहे. वधू अल्पवयीन असल्याचे कळताच भटजीनेही थेट स्टेजवरूनच उडी मारून धूम ठोकली.

काही वर्‍हाडी जेवायला बसले होते. तर काहीजण अद्याप जेवायचे बाकी होते. एक हजार लोकांच्या जेवणावळीची व्यवस्था असल्याने कोणालाही नवरी अल्पवयीन असेल अशी पुसटशीही कल्पना आली नाही. अधिकार्‍यांनी येताच मुलगी कुठे आहे, असा सवाल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून घरच्यांनी मुलीला लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र चाणाक्ष अधिकार्‍यांनी अगोदरच फिल्डिंग लावल्याने मुलीला ताब्यात घेतले.

उपस्थित असलेल्या राजकीय पुढार्‍यांनी अधिकार्‍यांची दिलगिरी व्यक्त करत केवळ दोनच महिने कमी आहेत. लग्न होऊदे, पुन्हा मुलगीला घरी पाठवतो व पुन्हा दोन महिन्यांनी आणतो, अशी विनवणी केली. मात्र अधिकार्‍यांनी त्याला साफ नकार देत कारवाई सुरू ठेवली. कारवाईत कुणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा गुन्हे दाखल करू, असा सज्जड दम दिल्यानंतर आता काहीच चालणार नाही, असे झाल्यावर शेवटी मुलीला बालसुधारगृहाकडे पाठवून पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. अधिकार्‍यांनी लग्नाच्या यादीसह अन्य बाबी तपासल्याने आता सहभागी लोकांनाही याची काळजी वाटू लागली.

आता दाखला पाहावा लागणार?

या लग्नाला गेलेल्या अनेकांना झाला प्रकार पाहून आता यापुढे लनगला जाताना मुलगीचा दाखला बघावा लागणार की काय, अशी चर्चा लग्नस्थळावर सुरू होती. अल्पवयीन मुलीची जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्या मार्फत पुढील चौकशी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news