आईच्या आठवणी जपण्यासाठी कोल्हापुरात आल्या पोलंडच्या लेकी

इव्होना त्याझकोवाका अन् मार्था पॉल्युच झाल्या भावुक; वळिवडेतील स्मृतिसंग्रहालयाला भेट
कोल्हापूर :  1) इव्होना त्याझकोवाका आणि मार्था पॉल्युच. 2) 80 वर्षांपूर्वी वळिवडे कॅम्पमध्ये पाणी भरणार्‍या रमाबाई कांबळे यांच्यासोबत इव्होना त्याझकोवाका.
कोल्हापूर : 1) इव्होना त्याझकोवाका आणि मार्था पॉल्युच. 2) 80 वर्षांपूर्वी वळिवडे कॅम्पमध्ये पाणी भरणार्‍या रमाबाई कांबळे यांच्यासोबत इव्होना त्याझकोवाका. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : ‘कोल्हापूरने आश्रय दिला म्हणून आम्ही जिवंत राहू शकलो... कोल्हापूरच्या मातीत माया आहे... आपुलकी आहे... आमच्या आयुष्यातील पाच वर्षांचा तो काळ पुनर्जन्म देणारा होता...’ आईकडून कोल्हापूरविषयी या भावना ऐकतच इव्होना आणि मार्था मोठ्या झाल्या. दोघींच्या आईंच्या 80 वर्षांपूर्वीच्या काळातील कोल्हापूरशी जोडलेल्या त्याच आठवणी जपण्यासाठी इव्होना त्याझकोवाका आणि मार्था पॉल्युच या दोघी कोल्हापुरात आल्या आहेत. वळिवडे येथे पोलंडवासीयांच्या स्मृतिसंग्रहालयाला भेट देताच त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि डोळे पाणावले.

दुसर्‍या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या पोलंडवासीयांच्या ताफ्यातून 1942 ला स्टेफनिया सुडोल आणि दानुता निवस्का या कोल्हापुरात आल्या होत्या. छत्रपती घराण्याने वळिवडे येथे पोलंडवासीयांसाठी उभारलेल्या निवारा छावणीत पुढे पाच ते सहा वर्षे त्यांचा मुक्काम होता. इव्होना यांच्या आई स्टेफनिया या नर्स असल्याने त्यांनी कॅम्पसह वळिवडेतील अनेकांची सूश्रुषाही केली होती. मार्था यांच्या आई दानुता या समाजसेविका होत्या. युद्धाचे ढग शांत झाल्यानंतर अनेक पोलंडवासीय विविध देशांत स्थायिक झाले. मार्था आणि इव्होना यांच्या आईही कुटुंबासह लंडनला गेल्या; पण कोल्हापुरात मिळालेल्या मायेच्या आठवणी त्यांच्या मनातून कधी पुसल्या नाहीत.

त्या काळात कोल्हापूरकरांनी दाखवलेली आपुलकी, छत्रपती घराण्याने दिलेला आश्रय, शिक्षण-आरोग्याच्या सुविधा आणि कॅम्पमधील हसते-खेळते, सुरक्षित वातावरण या सार्‍या गोष्टी त्यांच्या आईंनी मार्था आणि इव्होना यांना वारंवार सांगितल्या होत्या. त्या आठवणींचा ठेवा जपण्यासाठीच या दोघी कोल्हापुरात आल्या आहेत. वळिवडेतील नियोजित स्मृती संग्रहालयाच्या उभारणीसाठी आपले योगदान द्यावे या भावनेतून मार्था आणि इव्होना यांनी वळिवडेतील कॅम्पच्या जागेला भेट दिली. या भेटीदरम्यान इव्होना आणि मार्था यांनी संभाजीराजे यांचीही भेट घेतली.

वळिवडेतील 94 वर्षांच्या आजी बोलल्या पोलिश भाषेत

या भेटीतला सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे वळिवडे कॅम्पमध्ये 80 वर्षांपूर्वी पाणी भरण्याचे काम करणार्‍या आणि आज 94 वर्षांच्या असलेल्या रमाबाई कांबळे यांची गळाभेट. त्या काळात अवघ्या 15 वर्षांच्या असलेल्या रमाबाईंनी पोलंडवासीयांशी गप्पा मारता मारता पोलिश भाषा शिकून घेतली होती. इव्होना आणि मार्था यांच्याशी रमा आजींनी पोलिश भाषेत संवाद साधताच पोलंड आणि कोल्हापूरचा 80 वर्षांचा बंध नव्याने घट्ट झाला. रमा आजींना भेटताच मार्था आणि इव्होना यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आईने सांगितलेल्या आठवणी त्याक्षणी जिवंत झाल्या. इतिहासातील एक वेदनादायी काळ आणि कोल्हापूरच्या दातृत्वाची परंपरा यांचा साक्षात्कारच जणू या भेटीतून पुन्हा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news