Sahyadri Tigers | सह्याद्रीतील वाघांवर तस्करांची वाईट नजर

शिकार केली जाण्याची वन्यजीव अभ्यासकांना भीती
Sahyadri Tigers |
Sahyadri Tigers | सह्याद्रीतील वाघांवर तस्करांची वाईट नजर
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सुभेदार, बाजी, सेनापती हे नर वाघ आणि चंदा, तारा, हिरकणी या वाघिणींवर तस्करांची वाईट नजर आहे. आंतरराज्यीय वन्यप्राणी तस्कारांकडून या वाघांची शिकार केली जाण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून कराड तालुक्यातील शहापूर, तांबवे आणि खोडशी या गावांमध्ये आंतरराज्यीय टोळी पद्धतीचे वाघांची शिकार करणारे लोखंडी सापळे आढळत आहेत.

एवढेच नव्हे, तर या सापळ्यात बिबट्या अडकल्याने भीतीची छाया गडद झाली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी आता ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ची (एसटीपीएफ) स्थापना गरजेची असून लोकप्रतिनिधींनी त्यासाठी तातडीने पाठपुरावा केला पाहिजे, अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांतून होत आहे. ताडोबा आणि पेंच येथून आणलेल्या वाघांचा सह्याद्रीच्या कड्याकपारीत सध्या मुक्त वावर सुरू आहे. चंदा, तारा, हिरकणी या तीन वाघिणींच्या गळ्यात अत्याधुनिक जीपीएस कॉलर आहे. तीन डौलदार नर वाघांच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाचे कॅमेरे आणि डोळ्यात तेल घालून काम करणारे कर्मचारी नजर ठेवून आहेत. मात्र, विशेष सुरक्षेअभावी भविष्यात या वाघांवर आंतरराज्यीय शिकारी टोळ्यांची वक्रद़ृष्टी पडण्याची शक्यता आहे. वाघांना असलेला धोका पाहता त्यांच्या संरक्षणासाठी ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची स्थापना महत्त्वाची आहे. त्यासाठी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) 5 डिसेंबर 2023 रोजी शासनाला यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे.

कराडमधील सापळे हे ट्रेलर, पिक्चर बाकी

कराडमध्ये सापडलेले सापळे हे केवळ ट्रेलर आहेत. जर या तस्करांनी सह्याद्रीच्या बफर झोनपर्यंत मजल मारली असेल तर व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी हा धोका असू शकतो. हे सापळे ससे किंवा डुकरांसाठी नसून मोठ्या मांसाहारी प्राण्यांना पकडण्यासाठीच डिझाईन केलेले असतात, हे खोडशीमध्ये बिबट्या अडकल्याच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी एसटीपीएफसाठी आग्रही आहेत. सरकार एसटीपीएफला मंजुरी देण्यासाठी एखाद्या वाघाच्या शिकारीची वाट पाहणार आहे का, असा सवाल वन्य प्रेमींमधून होत आहे.

अ‍ॅडव्हान्स सुपारी घेऊन केली जाते वाघांची शिकार

भारतात वाघांच्या शिकारीसाठी मध्य प्रदेशातील कटणी आणि कर्नाटकातील शिमोगा भागातील टोळ्या कुख्यात आहेत. चंद्रपूर आणि नागपूरच्या जंगलांना लागून असलेल्या कटणी जिल्ह्यात काही टोळ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचा उदरनिर्वाहच शिकारीवर चालतो. हे लोक वाघाचे कातडे आणि हाडांसाठी अ‍ॅडव्हान्स सुपारी घेतात आणि वेगवेगळ्या राज्यांत जाऊन अत्यंत सफाईदारपणे लोखंडी सापळे लावून वाघांची शिकार करतात. कराडमध्ये आढळलेले सापळे आणि शिकारी टोळ्या वापरत असलेले सापळे यांच्या रचनेत विलक्षण साम्य दिसून आल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.

येथे आहे एसटीपीएफ

व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी देशातील 13 व्याघ्र प्रकल्पांत एसटीपीएफ कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा आणि मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांसह कर्नाटकातील बांदीपूर, राजस्थानमधील रणथंबोर, ओडिशातील सिमलीपाल आणि आसाममधील काझीरंगा येथे हे दल कामगिरी बजावत आहे.

राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पांसाठी रेड अलर्ट

वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून अटक करण्यात आली होती. या टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांची शिकार केल्याचा संशय आहे. कटणी परिसरातून येणारे हे शिकारी पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news