

कोल्हापूर : जिल्ह्यात मागील वर्षात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या स्थितीचा अभ्यास करा. त्या अनुभवावर यावर्षी पूरस्थिती निर्माण झाली, तर त्यास कसे सामोरे जावे, याचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिल्या. अलमट्टी व हिप्परगी धरण प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालायात संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी आढावा बैठक घेतली. आबिटकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरात जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक यंत्रणा बिघडली होती. महापालिकेने साचलेल्या पाण्याच योग्य निचरा होण्यासाठी नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे, जास्त पाणी साचल्यास त्या पाण्याचा निचरा कसा करता येईल याचे नियोजन करा, पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या.
धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करा, अशा सूचना देत आबिटकर म्हणाले, अलमट्टी धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा, पूरस्थिती हाताळण्यासाठी एसओपी तयार करा. परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवा. त्यात उणिवा राहू नये याची खबरदारी घ्या. भूस्खलना होणार्या गावांचे ऑडिट करण्यासाठी समिती नेमा, बरेच ठिकाणी नागरिकांकडून माती उकरून काढली जाते, त्यामुळे भूस्खलनाच्या घटना होऊ नयेत, यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी नागरिकांना सूचना द्यावी.
आमदार अमल महाडिक म्हणाले, पावसाळ्यात नागरिक धबधबा व धरणावर फिरायला जातात. अशावेळी नागरिकांना प्रशासनामार्फत सूचना द्याव्यात. वापरात नसलेले जुन्या पुलावरून वाहने चालवू नयेत, यासाठी प्रशासनामार्फत सूचना द्याव्यात.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, भूस्खलन गावांच्या ऑडिटसाठी समिती गठीत केली जाईल. त्या गावांचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी आयआयटी मंडीसोबत करार झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनीही माहिती दिली.
यावेळी आमदार डॉ. अशोकराव माने, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.