

कोल्हापूर : मुलींमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. या संवेदनशील काळात किशोरवयीन मुलांना स्वच्छता, गोपनियता व आत्मसन्मान जपता यावा यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये पिंक रुम हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. असा उपक्रम राबिवणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तब्बल 833 शाळांचा समावेश करण्यात आला असून, आजअखेर 770 शाळांमध्ये ‘पिंक रूम’ उभारण्यात आल्याचे सांगून कार्तिकेयन पुढे म्हणाले, मासिक पाळीवेळी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे यासाठी ‘पिंक रूम’ ही सुरक्षित जागा मिळणार आहे. साधारणपणे 15 बाय 15 फूट आकाराची ही पिंक रूम आहे. जागा उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये 18 फूट बाय 22 फूट आकाराची वर्गखोली ‘पिंक रुम’ म्हणून वापरण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी लोकसहभाग, माजी विद्यार्थी संघ तसेच शासनाच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ‘पिंक रूम’चा वापर क्रीडा, योग व पीटी तासादरम्यान कपडे बदलण्यासाठी होणार आहे. या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होणार असून त्यांच्यामध्ये जागरूकता वाढणार आहे. तसेच मुलींच्या उपस्थितीत वाढ होऊन शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंक रूमच्या दर्शनी भागावर फलक लावण्यात येणार असून दरवाजाला पडदा, खुर्ची, टेबल, आरसा, बेड, पिण्याचे पाणी, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन, डस्टबिन व सुरक्षा व्यवस्था असणार आहे.