

कोल्हापूर : फुलेवाडी येथील अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या स्लॅब दुर्घटनाप्रकरणी महापालिका प्रशासनाने शनिवारी कारवाईचा बडगा उगारला. कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित केले; तर शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना खातेनिहाय चौकशी का करू नये, याबाबत शो कॉज नोटीस बजावली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ही कारवाई केली. फुलेवाडी येथे अग्निशमन केंद्र विकास व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम सुरू होते. 30 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एका सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला; तर पाच कामगार जखमी झाले. या दुर्घटनेमुळे महापालिकेतर्फे होणार्या विविध कामांच्या दर्जाबाबत शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली. पालकमंत्री आबीटकर यांनी शुक्रवारी महपाालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
बैठकीनंतर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शनिवारी कारवाईचा बडगा उगारला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत दुर्घटना घडल्याने या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता बराले यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आले. शहर अभियंता मस्कर आणि शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.