

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी.च्या जुन्या नियमामध्ये या वर्षापासून बदल केला असून, अर्जापासून डिग्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया आता ऑटोमेशनद्वारे होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि गाईड यांना अॅक्टिव्ह मोडवर राहावे लागणार आहे.
पूर्वी पारंपरिक पद्धतीने पीएच.डी.साठी अर्ज करून तसेच त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करताना बराच कालावधी लागत होता. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक होती. यात अपेक्षित काम होत नसल्याने विद्यार्थ्यांना पीएच.डी.चा संशोधन प्रबंध सादर करण्यास विलंब लागत होता. या सर्व गोष्टींचा विचार करून यात सुधारणा करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार यंदापासून ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन म्हणजे ऑटोमेशन प्रणालीद्वारे केली जाणार आहे. सध्या मुंबई, पुणे विद्यापीठांसह इतर ठिकाणी या प्रणालीचा वापर केला जात असल्याचे समजते. विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 70 ते 80 पीएच.डी. रिसर्च सेंटर असून, साधारणपणे 2 हजार गाईड आहेत. पीएच.डी. करणार्यांची संख्या 5 हजारांहून अधिक आहे. ऑटोमेशन प्रणालीद्वारे पीएच.डी. अॅडमिशन प्रोसेस, रिझर्व्हेशन कोटा, पोझिशन, कोर्सवर्क तसेच सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रिपोर्ट तपासणे ही कामे केली जाणार आहेत. नवीन प्रणालीमुळे गाईडचे काम वाढण्याची शक्यता आहे. या प्रणालीत संशोधन प्रबंध सादर करणारा विद्यार्थी, गाईड यांच्यात कायम सुसंवाद राहणार आहे. नवीन प्रणालीमुळे पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. संशोधन प्रबंध सादर केल्यानंतर तो कोणत्या स्टेजला आहे, हे विद्यार्थांना मोबाईलवर समजणार आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठरणार आहे. पीएच.डी. संशोधन पूर्ण झाल्यावर ज्या दिवशी मुलाखत होईल, त्याच दिवशी विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे.
पूर्वी पीएच.डी.साठी संशोधन प्रबंधाच्या सहा प्रती सादर कराव्या लागत होत्या. नवीन ऑटोमेशन प्रणालीद्वारे सर्व कागदपत्रे यासह विद्यार्थ्यांना लॉगीनमध्ये ऑनलाईन पद्धतीने अपलोड करता येणार आहेत. गाईड व बाहेर असणार्या परीक्षकांना पीएच.डी. संशोधन प्रबंधाची सॉफ्ट कॉपी पाठवली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.