

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शुक्रवारी (दि. 11) करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडे घातले जाणार आहे. जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांचा व नागरिकांचा तीव्र विरोध आहे. तरीही या महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबई येथे बैठक बोलावून आमदार राजेश क्षीरसागर हेतूपूर्वक शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. यामुळे त्यांना सद्बुद्धी द्यावी, याकरिता शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने अंबाबाईचरणी साकडे घालण्यात येणार आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला शक्तिपीठ महामार्गाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. महापुरासह क्षारपड जमिनीचे प्रमाण जिल्ह्यात वाढणार आहे. यामुळे ऊस उत्पादनात जवळपास 15 ते 20 टक्के कपात होणार आहे. पट्टणकोडोली ते माणगाव या पुलाच्या जवळपास 50 फूट भरावामुळे कोल्हापूर शहरात पुराचे पाणी वाढणार आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ते 6 फूट पाणी असते मात्र या पुलाच्या भरावामुळे शहरात 2019 व 2021 पेक्षा 15 ते 20 फूट पाण्याची पातळी वाढणार आहे.
आ. क्षीरसागर हे कोल्हापूरच्या नागरिकांना पुराच्या संकटात टाकत आहेत. त्यांना सद्बुद्धी सुचावी याकरिता शुक्रवारी (दि. 11) दुपारी 12 वाजता शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आई अंबाबाईला साकडे घातले जाणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर, सचिन चव्हाण, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, संदीप देसाई, सम्राट मोरे, बाबासो देवकर, अतुल दिघे, अजित पोवार सुभाष देसाई, भरत रसाळे आदींसह शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर ः नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी (दि. 11) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता बैठक होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाविषयी बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील 62 गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र विरोधक राजकारण करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचे भासवत आहेत. वास्तविक या गावांतील ग्रामस्थांचे महामार्गाला समर्थन आहे. परिणामी विरोधाची धार कमी होत आहे. शेतकर्यांना महामार्ग पाहिजे आहे. कारण राज्यात ज्या ठिकाणी महामार्ग झाला, तेथील जमिनीला भाव आला असून, त्या परिसराचा विकासही झाला आहे. विरोधकांचा डाव शेतकर्यांच्या लक्षात आला असून शेतकर्यांना वस्तुस्थिती समजू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव शुक्रवारी होणार्या बैठकीसाठी गुरुवारी रात्री मुंबईला रवाना झाल्याचे आ. क्षीरसागर यांनी सांगितले.