पेठवडगावचा शाहूकालीन महालक्ष्मी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या बांधकाम,औद्योगीक वसाहतीमधील प्रदूषित सांडपाणी ओढ्यातून तलावात येत आहे. वडगावच्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होण्याअगोदर प्रशासनाने पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महालक्ष्मी तलाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी तलाव स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करताना म्हणाले, गेल्या चार-पाच वर्षात तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व रहिवास क्षेत्र पाणलोट क्षेत्रात बांधकामे होत आहेत. यामध्ये कुरण्यातील अंबाबाई मंदिर परिसरात होत असलेल्या औद्योगिक व सांडपाणी थेट तलावातील ओढ्यात येत आहे. येथे ट्रिटमेंन्ट प्लॅन्ट दाखवण्या पुरता बसवलेला आहे. येथे यामुळे थेट पाणी तळ्यात मिसळत आहे. याच पध्दतीने संभापुर रोडला डीएन विंड समोर बालाजी पार्क मध्ये प्लॉट पाडून विकले आहेत. या ठिकाणी रहिवास वसाहत विकसित होत आहे. याचे सांडपाणी चौगुले मळा परिसरातुन ओढ्यात सोडले आहे.
याबरोबरच हॉटेल, दुकाने, फार्महाउस बांधलेली आहेत. याबाबतीत गेली तीन वर्षे जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुन सुध्दा प्लॉटिंगसाठी, औद्यागिकरणासाठी कसे परवाने दिले गेले यांची चौकशी करावी अशी मागणी करताना त्यांनी पावसाळ्यापुर्वी पालिका प्रशासनाने ओढ्याची साफ-साफाई योग्यपध्दतीने केलेली नाही. यामुळे या परिसरातील शेतीला धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, याबाबत आम्ही व येथील शेतकरी यांनी वेळोवेळी अनेक तक्रारी केल्या आहेत. जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात तलावाची बिकट अवस्था होणार आहे. पाणलोट क्षेत्रात औद्योगिक व रहिवासी हे प्रदुषण थांबवले पाहिजे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होणार आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप पाटील, अभिजीत गायकवाड, गुरुप्रसाद यादव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष जगन्नाथ माने, दीपक पाटील, वैभव हिरवे, प्रविण पाटील, वसंत पन्हाळकर उपस्थित होते.