

पेठवडगाव : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे वारणा नदीकाठावरील भागात महापुराचा धोका अधिक तीव होणार असून, यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना मोठ्या आर्थिक व पर्यावरणीय संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
वारणा नदी परिसरात आधीच पुणे-बंगळूर महामार्गावरील पूल, आष्टा-वडगाव रस्त्यावरील पूल तसेच थोड्या थोड्या अंतरावर अनेक पूल आणि त्यांच्या भरावांमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा आल्याने 2004 पासून वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा पडत आहे. पावसाळ्यात नदीला आलेले पाणी वेगाने वाहून न जाता साचते आणि काही तासांतच महापुराचे रूप धारण करते. अशा परिस्थितीत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात उंच भराव तयार करण्यात येणार आहे. हा भराव नदीच्या नैसर्गिक पाणी वाहतुकीत अडथळा निर्माण करणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वारणा नदीकाठावरील सुपीक बागायती जमीन दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्यास तिची उत्पादकता कमी होऊन जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होईल. तसेच, गावांनाही या महापुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून घरे, जनावरे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे विकासापेक्षा विनाशाची शक्यता अधिक असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, वारणा नदीकाठावरील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.