

Kolhapur Shivaji university research germany patent
आशिष शिंदे
कोल्हापूर : साबरकांड, शेराचे झाड या शेंदरी कुळातील वनस्पतींच्या दुधाळ रसावर (लॅटेक्स) प्रक्रिया करून कीड नियंत्रण करणारे जैवकीटकनाशक शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. युफोर्बिएसी कुळातील या वनस्पतींच्या रसाचा वापर करून बनविलेल्या बायोपेस्टिसाईड फॉर्म्युलेशनला जर्मनीकडून उपयुक्त पेटंट मिळाले आहे. कोबी, मिरची, वांगी यासारख्या पिकांवरील मावा, फुलकिडे, पांढर्या माश्यांवर हे जैवकीटकनाशक प्रभावी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
युफोर्बिएसी हे जगभर पसरलेले मोठे वनस्पती कुळ असून, त्यातील अनेक जातींमध्ये पांढरट दुधाळ रस आढळतो. या रसामध्ये जैव सक्रिय घटक असतात. त्यामध्ये कीटकनाशक, जीवाणूनाशक व बुरशीनाशक गुणधर्म असतात. संशोधकांनी साबरकांड (युफोर्बिया अँटिक्वोरम) आणि शेराचे झाड (युफोर्बिया तिरुकल्ली) या वनस्पतींतील दुधाळ रसावर प्रयोग करून कीटकनाशक तयार केले आहे.
हे कीटकनाशक कोबीवरील मावा (ब्रेविकोरीन ब्रॅसिका) आणि मिरचीवरील फुलकिडे (थ्रिप्स परविस्पिनस) यासारख्या वनस्पतींतील रसशोषक किडींवर प्रभावी आहे. याशिवाय नैसर्गिक पॉलिमर घटकांमुळे औषध फवारणीनंतर पिकांच्या पानांवर अधिक काळ टिकते व पावसामुळे धुवून जाण्याची शक्यता कमी होते.
युफोर्बिएसी हे एक वनस्पतींचे मोठे कुळ आहे, ज्याला मराठीत दूधवर्गीय वनस्पती म्हणतात. वनस्पतींच्या या कुळात 300 पेक्षा जास्त प्रजाती आणि 7 हजार 500 हून अधिक जाती आहेत. या कुळातील बहुतांश वनस्पतींचे खोड, पाने किंवा फळ कापल्यावर दुधाळ पांढरट रस बाहेर येतो. हा रस नैसर्गिक रसायनांनी समृद्ध असतो.
या वनस्पतींच्या खोडातून आणि पानांतून दुधासारखा रस गोळा करण्यात आला. नंतर हा रस थंड तापमानात वाळवून त्याची बारीक पावडर करण्यात आली. या पावडरला पर्यावरणास सुरक्षित अशा द्रव पदार्थांमध्ये (हरित सॉल्व्हेंट) मिसळून आणि औषध पानांवर नीट पसरावे म्हणून विशेष मिश्रक (सर्फक्टंट) घालून द्रवरूप जैवकीटकनाशक तयार करण्यात आले.