

कोल्हापूर : महापालिकेतील ड्रेनेज प्रकल्पाच्या कामात टक्केवारीच्या बदल्यात बिल पास केल्याचा आरोप स्वतः ठेकेदारानेच ठोस पुराव्यांसह केल्यानंतर ‘आप’ने भ्रष्ट महापालिका यंत्रणेचा तीव्र निषेध नोंदवला. महापालिकेसमोर नोटांचा पाऊस पाडत आणि अधिकार्यांच्या प्रतीकात्मक कचरा पेट्यांना ‘मी टक्केवारी खातोय’ अशी टोलेबाज पाट्या लावून हे आंदोलन करण्यात आले.
महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पातील संबंधित बिल काढण्यासाठी अधिकार्यांना टक्केवारी दिल्याचा दावा एका ठेकेदाराने केला आहे. या आरोपांमध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, पवडी अकौंटस् विभागातील अधीक्षक, तसेच शहर अभियंता, मुख्य लेखापाल आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंतच्या अधिकार्यांची नावे घेतली गेली आहेत.
‘मी पैसे खातोय’, ‘माझं पगारात भागत नाही’ पेट्यांवरील लेखनाची चर्चा होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात वापरलेल्या प्रतीकात्मक कचरा पेट्यांवर लिहिलेली वाक्ये ही सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या प्रकरणाचा तपास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सोपवावी, अशी मागणी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. या आंदोलनात प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई ‘आप’चे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयूर भोसले, लखन काझी, रमेश कोळी, चेतन चौगुले सहभागी झाले होते.