जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच : मंत्री हसन मुश्रीफ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समन्वयाने लढू
Minister Hasan Mushrif
हसन मुश्रीफ Pudhari FIle Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गेली 20 वर्षे मी मंत्रिपदावर आहे. त्यापैकी केवळ 14 महिनेच पालकमंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली. महायुतीच्या नेत्यांच्या चर्चेतून पालकमंत्रिपदाचे धोरण ठरविण्यात आले आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना सांगितले. महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक समन्वयानेच लढू, असेही ते म्हणाले.

शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौर्‍यावरून सकाळीच आलो. त्यामुळे काय घडले, मला माहीत नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांना शेतीचा छंद आहे. त्यासाठी ते गावी जात असतात. मुख्यमंत्रीही दावोसला गेल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक होणार नसल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे गावी आले असतील, असे मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रिपदांच्या वाटपाचे तत्त्व ठरवले आहे. तत्त्व बिघडले की रायगड, नाशिकमध्ये जे घडले तशा घटना घडत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून परत आल्यानंतर हा सगळा प्रश्न मिटेल.

मनपा, जिल्हा परिषदेत समन्वयानेच लढू

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी मी उचलली आहे. महायुतीमधील सर्व पक्षाचे नेते चर्चा करून एकत्र जाण्याची भूमिका घेतील. ज्याठिकाणी आमची ताकद आहे, तिथे एकत्र लढू. एखाद्या प्रभागात महायुतीतील घटक पक्षांचेच तीन-चार उमेदवार इच्छुक असतील आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव होणार असेल तर तिथे योग्य तो तोडगा काढू. परिस्थितीनुसर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. परंतु जिल्हा परिषदेसह कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही समन्वयानेच लढू, असेही मुश्रीफ म्हणाले.

सहपालकमंत्री विषय काय ते मुंबईत समजून घेईन...

सहपालकमंत्री हा नवीनच प्रकार सुरू झाला असल्याचे विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, सहपालकमंत्री ही गोष्ट नवीन आहे हे खरे आहे. यापूर्वी त्याच जिल्ह्यात एखादा दुसरा मंत्री असेल तर तो सहपालकमंत्री असायचा. मी मुंबईला गेल्यानंतर सहपालकमंत्री विषय काय आहे, हे नक्की समजून घेईन, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news