

कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार उसाला समाधानकारक दर देण्यास तयार आहेत. मग, महाराष्ट्रातील कारखाने उस दरात मागे का, असा प्रश्न उपस्थित करत उसाला पहिली उचल ४५०० रुपये द्या, अन्यथा उस दरासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला. तसेच योग्य दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत घेतली.
शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी ऊस दरप्रश्नी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. संजय मंडलिक उपस्थित होते. ऊस दरासाठी झालेल्या पहिल्याच बैठकीत दराबाबत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. बैठकीत दराचा तिढा कायम राहिला असून पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, साखरेच्या किमान विक्री दराचा मुद्दा २० नोव्हेंबरपर्यंत निकालात निघणार आहे. तोपर्यंत थांबणे शक्य नाही. यंदा रिकव्हरी आणि वजनात घट झाली आहे. दुष्काळामुळे धरणातून नदीत पाणी सोडले जात नाही . त्यामुळे शेतकर्यांना उभ्या पिकांना पाणी द्यायचे कुठून, असाही प्रश्न पडला आहे. यामुळे पहिली उचल म्हणून साखर कारखान्यांनी प्रस्ताव द्यावा, अशी भूमिका आम्ही मांडली आहे. ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, ही आमची मागणी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सकारात्मक पद्धतीनेच योग्य तोडगा
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. केंद्र सरकारकडून निश्चित केली जाणारी साखरेची एमएसपी तसेच सध्याचा बाजारातील दर लक्षात घेऊन कारखानदारांनी शेतकर्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घ्यावा, यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच दुष्काळाची परिस्थिती, ऊस हंगाम आणि शेतकर्यांची होत असलेली कोंडी लक्षात घेता उसाला योग्य दर मिळण्यासाठी सकारात्मक पद्धतीने पुढे यावे, तरच योग्य मार्ग निघू शकतो.
कर्नाटकात उद्या बैठक
बैठकीमध्ये शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात सोमवारी (दि.२६) बैठक होत आहे. तेथील कारखानदार भरघोस दर देण्यास तयार आहेत. बैठकीत होणार्या निर्णयाचा प्रभाव सीमाभागातील ऊसदरावर पडणार असल्याचे सांगितले.