

विशाळगड : दाट धुके, कोसळणाऱ्या मुसळधार सरी आणि निसरड्या वाटांची पर्वा न करता, 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय'च्या जयघोषात हजारो शिवभक्तांनी पावनखिंड दणाणून सोडली. निमित्त होते, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतुलनीय शौर्याला ३६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पुण्यतिथीचे.
या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करत, शाहूवाडी तालुका प्रशासनाच्यावतीने तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते बाजीप्रभूंना शासकीय मानवंदना देण्यात आली. पुष्पचक्र अर्पण करून या रणसंग्रामातील वीरांना आदरांजली वाहण्यात आली. प्रतिकूल हवामानातही केवळ श्रद्धेने आणि इतिहासाच्या ओढीने आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीने सह्याद्रीच्या डोंगररांगा दुमदुमून गेल्या होत्या.
१३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेढ्यातून विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजीप्रभू, शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या निवडक मावळ्यांनी घोडखिंडीत सिद्दी मसूदच्या सैन्याला रोखून धरले. 'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे,' या स्वामीनिष्ठेने प्रेरित होऊन बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या या खिंडीला 'पावनखिंड' असे नाव मिळाले. या घटनेला आता ३६५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या वीरश्रीला अभिवादन करण्यासाठी शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तहसीलदार गणेश लव्हे यांनी स्मृतिस्थळाचे पूजन केले. यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांनी बाजीप्रभूंच्या अजोड त्यागाचे स्मरण करत आदराने माथा टेकवला. या सोहळ्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून विविध संस्थांचे कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने आले होते. यामध्ये तरुण, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता.
"पावनखिंडीतील लढा ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती त्याग, निष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमाची अजरामर गाथा आहे. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी दाखवलेले शौर्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे." गणेश लव्हे, तहसीलदार, शाहूवाडी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठान, शिवराष्ट्र परिवार, कोल्हापूर हायकर्स, राजा शिवछत्रपती परिवार यांसारख्या अनेक शिवप्रेमी संघटनांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी कृषी अधिकारी नीलम चाकणे, सरपंच चंद्रकांत पाटील, सर्कल त्रिवेणी पाटील, तलाठी घनशाम स्वामी, ग्रामसेवक युवराज माने, पोलीस पाटील उदय जंगम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यामुळे पावनखिंडीचा परिसर केवळ इतिहासाच्या साक्षीनेच नव्हे, तर वर्तमानातील शिवभक्तीच्या चैतन्यानेही भारून गेला होता.